चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

चंद्रपूरगडचिरोलीवर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद

चंद्रपूर, दि. 25 : चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे 12 तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.

विदर्भातील या तीन जिल्ह्यांना दोन महिन्यांसाठी सलग वीजपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली. कृषी पंपाना सध्या नियमित विजेची गरज आहे. आता शेतात धान उभा आहे आणि बाकी पिकांना ही पाण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. याशिवाय उत्सवाचे दिवस आहे.

गडचिरोली हा नक्षल प्रभावी जिल्हा असल्याने शेतीसाठी व उत्सवाच्या काळात या जिल्ह्याला सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे ही बाब श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जा मंत्रांच्या लक्षात आणून दिली. चंद्रपूर आणि वर्धा हे दोन्ही जिल्हे विदर्भातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पिकाच्या दृष्टीने व नागरिकांना उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा होणे, गरजेचे असल्याची बाब या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. दोन महिने या तीनही जिल्ह्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला ऊर्जामंत्री यांनी  सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील या तीन जिल्ह्यांना सुरळीत वीज पुरवठा कसा करता येईल, या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.