उत्कृष्ट लसीकरण करणा-या गावांचा होणार सत्कार  – जिल्हाधिकारी गुल्हाने Ø स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 95 टक्के लसीकरणाची अट Ø जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लससाठा उपलब्ध

उत्कृष्ट लसीकरण करणा-या गावांचा होणार सत्कार  – जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 95 टक्के लसीकरणाची अट

Ø जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लससाठा उपलब्ध

चंद्रपूर दि. 4 ऑक्टोबर : जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. याचीच फलनिष्पत्ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पाच लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून आता लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ‘गावांची स्पर्धा’ होणार आहे. यात उत्कृष्ट लसीकरण करणा-या गावांची निवड करून तालुकास्तरावर व नंतर जिल्हास्तरावर सत्कार होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 16 लक्ष 41 हजार 830 नागरीक लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत 11 लक्ष 68 हजार 123 नागरिकांनी पहिला डोज (71 टक्के)  तर 3 लक्ष 61 हजार 408 नागरिकांनी दुसरा डोज (22 टक्के) घेतला आहे. अजूनही पहिला डोज न घेतलेल्यांची संख्या पाच लाखांच्या आसपास आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होत असून पात्र नागरिकांनी त्वरीत पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांचा दुसरा डोजचा कालावधी आला असेल त्यांनी आपले लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे.
पहिल्या डोजचे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आता गावांची स्पर्धा आयोजित करण्यात येईल. 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लसीकरण झालेली गावेच यात सहभागी होऊ शकतील. उत्कृष्ट लसीकरण करणा-या गावांची निवड प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर झाल्यानंतर संबंधित गावांचा तालुकास्तरावर सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर तालुका स्तरावर निवड झालेल्या गावांचा मान्यवरांच्या हस्ते जिल्हा स्तरावर सत्कार आयोजित करण्यात येईल. 23 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या डोजचे 100 टक्के लसीकरण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी युध्दस्तरावर काम करावे, अशा सुचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनी सादरीकरण केले. बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.