अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा मिळणार लाभ

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा मिळणार लाभ

चंद्रपूर दि. 4 ऑक्टोंबर : विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विकासाकरीता विविध योजना राबविण्यात येत आहे. यात दारिद्ररेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतात दर्जेदार फळे, भाजीपाला विकसित करण्याकरीता शेडनेटची उभारणी करणे, वनहक्क कायद्यांतर्गत प्राप्त जमिनीचा विकास करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या दारिद्ररेषेखालील लाभार्थ्यांना शेती अवजारे, खते व बि-बियाणे, फळबाग लागवडकरीता अर्थसाहाय्य देणे, प्लास्टिक अस्तरीकरणासह शेततळ्याचे बांधकाम करणे, ठिबक सिंचन व तुषार सिंचन संच बसविणे, शेतात ट्यूबवेल बसविणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या दारिद्ररेषेखालील शेतकऱ्यांना हळद लागवडीकरिता अर्थसहाय्य देणे, तसेच  आर्थिक उन्नतीसाठी मोगरा लागवड, शेत तलावातील प्लास्टिक अस्तरीकरण व भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) या योजनेअंतर्गत लघु उपसा सिंचन योजना अशा एकूण 10 योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.
प्रकल्पांतर्गत चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मुल, सिंदेवाही, सावली या तालुक्यातील अधिवास असलेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून सदर योजनेकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. योजनांचे अर्ज प्रकल्प कार्यालय चंद्रपूर, शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम शाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह येथे दि. 10 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नि:शुल्क उपलब्ध आहे.
सदर योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या व अटीची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे, असे आवाहन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.