राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाची 15 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाची 15 प्रकरणे निकाली

भंडारा,दि.1:- गुंतागुंतीची आणि वेळ खाऊ असे आपण सातत्याने न्यायदान प्रक्रियेबाबत ऐकत आलो आहोत परंतू आता या टिकेला बाजुला सारत पक्षकारांनी पक्षकारांसाठी स्वेच्छेने निवडलेली ‘वैकल्पीक वाद निवारण’ प्रक्रिया मात्र आता वाढीस लागली आहे. याचाच प्रत्यय म्हणजे 25 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित सफल झालेली राष्ट्रीय लोक अदालत. या लोक अदालतीमध्ये कौटुंबिक न्यायालयातील एकुण 23 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये 10 दिवाणी स्वरूपाची तर 13 प्रकरणे फौजदारी स्वरूपाची होती. न्याय हा केवळ आदेशाच्या स्वरूपात नसून तो दोन्ही पक्षकारांना समाधान देणारा असावा. या मूलभूत तत्वाला अनुसरून प्रकरणातील पक्षकारांना संवादाची मुक्त संधी देण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणजे संवादाने एकूण 7 दिवाणी प्रकरणे व 8 फौजदारी  प्रकरणे समोपचाराने मिटविण्यात आली. त्यापैकी 8 जोडपे आपसातील वाद मिटवून सोबत नांदावयास गेले. त्यांच्या सुखी संसाराची सुरवात कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनिता बी. शर्मा मध्यस्थीने घडून आली.
 लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे यांचे समयोचित मार्गदर्शन लाभले. या निमित्ताने प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस.खुणे त्यांच्या हस्ते जोडप्यांना रोपटे देवून संसाररूपी वेल वृध्दींगत करण्याबाबत शुभेच्छा दिल्या. विशेष बाब म्हणजे ही सर्व रोपटी न्यायालयीन परिसरात न्यायाधीशांनी कष्ट घेवून वाढवली होती. यावेळी पॅनल प्रमुख दिवाणी न्यायाधीश एम.ए.कोठारी, विवाह समुपदेशक श्रीमती आर.पी.कटरे, जिल्हा विधी  सेवा समितीचे सचिव एस.पी. भोसले उपस्थित होते. लोक अदालत यशस्वी होण्याकरीता कौटुंबिक न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक डी.एस.साकोरे, कनिष्ठ लिपीक व्ही.बी.बनकर, शिपाई एम.एम. मंडपे तसेच वकील व्ही.ए. रेहपाडे यांनी परीश्रम घेतले.