अन्न परवाना व नोंदणीसाठी विशेष मोहीम 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

अन्न परवाना व नोंदणीसाठी विशेष मोहीम

  • 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम

            भंडारा,दि.1: अन्न व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना व नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल रुपये 12 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांची वार्षिक उलाढाल रुपये 12 लाखापेक्षा कमी आहे. त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अन्न व्यवसायिकांनी परवान्याची व नोंदणीची मुदत संपण्यापूर्वी ऑनलाईन पध्दतीने परवाना व नोंदणी नुतणीकरण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालय भंडारातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व किरकोळ विक्रेते घाउक, भाजीपाला, फळे, पावभाजी, पाणीपुरी, अंडे, मास-मटन विक्रेते तसेच मासे विक्रेते व उत्पादक यांनी त्वरित अन्न परवाना नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभय देशपांडे यांनी केले आहे.
            परवाना व नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करावयाची असून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करुन विहित नमुन्यात अर्ज व ऑनलाईन शुल्क भरुनच व्यवसाय करावा. अर्ज करण्यासाठी fssai.gov.in या संकेतस्थळचा वापर करावा. जे अन्न व्यावसायिक विनापरवाना, विनानोंदणी अन्न व्यवसाय करतांना आढळून येतील त्यांचे विरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्याची तरतूद असून रुपये 5 लाखापर्यंत द्रव्यदंड व सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.