रब्बी हंगामात 14 हजार एकरवर हरभरा तर 6125 एकरवर ज्वारीच्या लागवडीचे नियोजन

रब्बी हंगामात 14 हजार एकरवर हरभरा

तर 6125 एकरवर ज्वारीच्या लागवडीचे नियोजन

चंद्रपूर दि.1 ऑक्टोंबर : जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये अंदाजित 14,420 एकर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवडीचे नियोजन तर अंदाजित 6125 एकर क्षेत्रावर ज्वारी पिकाच्या लागवडीचे नियोजन  असणार आहे. तरी लागवडीच्या नियोजनानुसार शेतक-यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रमातंर्गत रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे अंतर्गत लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज सादर करावे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रमातंर्गत रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये 3190 एकर क्षेत्रावर हरभरा पिकाची प्रात्यक्षिके होणार आहे. 1 एकर प्रात्यक्षिकाकरिता रुपये 3,600 अनुदान असून यामध्ये बियाणे व इतर निविष्ठा शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तसेच प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांमध्ये 10 वर्षाआतील वाणाकरिता रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदान याप्रमाणे 3369 क्विंटल बियाणे वाटपाचे लक्षांक जिल्ह्यात प्राप्त आहे. यामधून 11,230 एकर क्षेत्रावर लागवड होणार आहे.
            तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य कार्यक्रमातंर्गत रब्बी हंगामात 2750 एकर क्षेत्रावर ज्वारी पिकाची प्रात्यक्षिके होणार आहे. 1 एकर प्रात्यक्षिकाकरीता रुपये 2400 अनुदान असून यामध्ये बियाणे व इतर निविष्ठा शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तसेच प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांमध्ये 10 वर्षावरील वाणाकरीता रुपये 1500 प्रति क्विंटल अनुदान याप्रमाणे 115  क्विंटल बियाणे वाटपाचे लक्षांक जिल्ह्यात प्राप्त आहे. यामधून 2875 एकर क्षेत्रावर लागवड होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे 10 वर्षाआतील वाणाकरिता रुपये 3000 प्रति क्विंटल अनुदान याप्रमाणे 210 क्विंटल बियाणे वाटपाचे लक्षांक जिल्ह्यास प्राप्त आहे. महाबीज कडील बियाणे उपलब्धतेनुसार 500 एकर क्षेत्रावर लागवड होणे अपेक्षित आहे. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात अंदाजित 6125 एकर क्षेत्रावर ज्वारी पिकाची लागवड होणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक याचेंशी संपर्क साधावा.