डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना Ø अनुसूचित जाती, नवबौद्ध व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

Ø अनुसूचित जाती, नवबौद्ध व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

चंद्रपूर दि. 27 सप्टेंबर : राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन विशेष घटक योजना सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना:
            या योजनेअंतर्गत रुपये 1.50 लक्ष मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना नवीन विहीरीकरिता 2 लक्ष 50 हजार, विहीर दुरुस्ती 50 हजार, इनवेल बोअरींग 20 हजार, पंप संच 20 हजार, वीज जोडणी 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी रु. 1 लक्ष, तुषार संच रु. 25 हजार, किंवा ठिबक संच रु. 50 हजार या बाबीसाठी अनुदान देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असणे आवश्यक असून शेतकऱ्याकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तसेच शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना:
आदिवासी उपयोजना सुधारित करून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीरीसाठी रु. 2 लक्ष 50 हजार, विहीर दुरुस्ती 50 हजार,इनवेल बोअरींग 20 हजार, पंपसंच 20 हजार, वीज जोडणी 10 हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण रु. 1 लक्ष, तुषार संच रुपये  25 हजार, किंवा ठिबक संच रुपये 50 हजार, पीव्हीसी, एचडीपीई पाईप रु. 30 हजार या बाबींसाठी अनुदान देण्यात येते.
सदर योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक असून शेतकऱ्याकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. सदर ऑनलाईन अर्ज प्रस्ताव पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.  योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.