सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांची मागणी

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांची मागणी

मुंबई२७ सप्टेंबर

केंद्र-राज्य सरकारांच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.अशात बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी तात्काळ हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी सोमवारी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यास्थितीतून बाहेर काढण्याचे सोडून केवळ शेतकऱ्यांमधील प्रतिमा जपण्यासाठी केंद्र-राज्य सरकार एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करीत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्यांना सरकार सापत्न वागणूक देत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या बांधावरील सोयाबीन भिजली आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहेत. अशात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. पंरतु, सरकारकडून शेतकर्यांच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोकणातील शेतकर्यांना ज्याप्रकारे राज्य सरकारने मदत जाहीर केली, अशीच मदत विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्यांना करावी, अशी मागणी अँड.ताजने यांनी यानिमित्ताने केली. केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीनचे भाव पडले आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला.

महिन्याभरापूर्वी सोयाबीनचे भाव १२ हजार क्विंटलपर्यंत गेले होते. पंरतु, आता हे दर ५ हजारांपर्यंत आले आहेत. सोयाबीन तेलाचे दर मात्र आहे तेवढेच आहे. यावरून सोयाबीनचे दर हेतुपुरस्सर पाडण्यात आल्याचा आरोप करीत राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने तात्काळ सोयाबीनचा हमीभाव वाढवून शेतकर्यांची सोयाबीन विकत घ्यावी, अशी भूमिका बसपा ची आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रातील विदर्भातील खरीप हंगामातील दुसरे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या वर्षी कमी उत्पादन आणि रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच अस्वस्थ होता.सध्या सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ९ ते १० हजारांवरून  ४ ते ६ हजार क्विंटलवर आला आहे. सोयाबीनचे किमान समर्थन मूल्य ३ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल आहे. १.२ मिलियन टन सोयामील आयात करण्याच्या अलीकडच्या निर्णयामुळे किमती घसरल्या आहेत, असे देखील बोलले जात असल्याचे अँड.ताजने म्हणाले.

‘सपा’ शहर अध्यक्षांचा बसपात प्रवेश
बसपाचे प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना यांच्या उपस्थितीत औरंगाबाद मधील समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष आयुब भाई पटेल, ऑल इंडिया जमातुल कुरेशी संघटनेचे शहर महासचिव मोहम्मद कुरेशी आणि महेंद्र वाघमारे यांनी बसपात प्रवेश करीत पक्षविस्तार आणि पक्षसंघटन मजबुत करण्याचा निर्धार केला.यावेळी बसपाचे प्रदेश महासचिव पंडित दादा बोर्डे, जेष्ठ नेते मुकुंदादा सोनोने, प्रदेश सदस्य नदीम चौधरी  प्रदेश सचिव सचिन बनसोडे,जिल्हा अध्यक्ष समाधान जाधव तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.