अमली पदार्थ बाळगणा-यांची माहिती प्रशासनाला दया- जिल्हाधिकारी

अमली पदार्थ बाळगणा-यांची माहिती प्रशासनाला दया- जिल्हाधिकारी

 

भंडारा, दि. 16 : दिवसेदिवस तरूणाई विविध अमली पदार्थाच्या जीवघेण्या विळख्यात आवळली जात आहे. उमेदीच्या काळात जडलेले व्यसन हे आयुष्यासाठी पर्यायाने समाजासाठी घातक आहे. तरी देखील फक्त शासन व प्रशासन अमली पदार्थ विरोधी लढा देत असले तरी सुजाण नागरिकांनी देखील त्यांचे कर्तव्य बजावणे अपेक्षीत आहे.

 

आजूबाजूच्या परिसरात जर कोणी अमली पदार्थ बाळगत असेल किंवा त्याची विक्री व अवैध वाहतूक करत असेल तसेच गांजा व अफूच्या शेतीची लागवड करत असेल तर तातडीने ही माहिती पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

 

अल्पवयीन मुलांसह तरुणाईमध्ये अलिकडे मादक पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. समाजासाठी हे अतिशय घातक आहे. त्यामुळे बालकांना अशा पदार्थांपासून दुर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा तसेच जिल्हाभर मादक पदार्थ शोध मोहिम राबवून या पदार्थाच्या विक्रीत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी काल घेतलेल्या अमली पदार्थ प्रतिबंध समितीच्या आढावा बैठकीत दिले. मादक पदार्थांचा गैरवापर व प्रतिबंध समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, अन्न व औषध विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

नशा केल्यानंतर आपण काय करतोय, याची शुद्ध राहत नसल्याने अल्पवयीन मुले गुन्हेगारीत अडकत जातात. मादक पदार्थांच्या यादीत अनेक नवीन द्रव्यांची भर पडत चालली आहे. याचा भयंकर दुष्परिणाम सेवन करणाऱ्या बालकांच्या किंवा व्यक्तीच्या मनावर, शरीरावर होत असतात. व्यसन हा आजार आहे. वेळेवर तज्ज्ञांची मदत घेतल्यास पुढील जीवन सुखी होऊ शकते. यासाठी सर्व यंत्रणांनी समनव्याने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिले तसेच पोलिस यंत्रणेबरोबर जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन व ईतर सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

 

मादक पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम

 

सततच्या व्यसनामुळे बालकांच्या शरीरावर अनेक घातक दुष्परिणाम होतात, दात, घसा, फुफ्फुस, ह्रदय, जठर, मूत्रपिंड, पचनसंस्थेचे गंभीर आजार होऊ शकतो. व्यसनाधीनतेमुळे मुलांच्या वर्तणुकीत अचानक बदल घडतो. डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. बोलतांना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे. भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता व मुलांमध्ये इतरही मानसिक आजार वाढतात.

 

पालकांनी काय काळजी घ्यावी

 

पालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे. त्याच्याशी मित्र म्हणून वागावे, काय वाईट काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्यावे. त्याच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. त्याला विश्वासात घेऊन वाईट मित्रांची संगत करू देऊ नये. शिक्षकांनी हुशार मुलांबरोबरच कमी मार्क्स असलेल्या मुलांकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही मुलाला कमी लेखू नये तसे झाले तर मुले व्यसनाकडे वळली जाण्याची शक्यता असते.

 

अमली पदार्थ आढळल्यास दंडासह शिक्षा

 

भारतामध्ये एनडीपीएस म्हणजेच अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार कुठलाही मादक पदार्थ बाळगणे हा गुन्हा आहे. हे पदार्थ वैयक्तिक वा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरणेही गुन्हाच आहे. मादक पदार्थ आढळून आल्यास या पदार्थाच्या प्रमाणानुसार दंड व शिक्षेची तरतूद आहे.