मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे बैठक

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी

पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे बैठक

Ø जंगलव्याप्त गावांना प्रत्येकी 25 लक्ष रुपये देण्याची मागणी

चंद्रपूर, दि. 24 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची तसेच बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे  मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. गत सहा महिन्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात जवळपास 18 नागरिकांचा मृत्यु झाला असून 50 पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले. या पार्श्वभुमीवर मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
बैठकीत मुख्यमंत्र्यांना माहिती देतांना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, ब्रम्हपूरी, सिंदेवाही व सावली या क्षेत्रात एकूण 117 च्या वर वाघांची संख्या आहे. वन्यप्राण्यांकडून मानवी वस्तीत होणारे हल्ले रोखण्यासाठी तिनही तालुक्यातील जंगलव्याप्त गावातील परिसराला चेनलिंग फेंसिग करण्याची नागरिकांची मागणी आहे. ब्रम्हपूरी व सिंदेवाही तालुक्यातील जंगललगतच्या गावांकरीता 38 कोटी 69 रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तसेच सावली तालुक्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जंगलालगतच्या गावांकरीता 40 कोटी रुपयांचा निधी मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेंतर्गत शेतात सोलर फेंसिग करणे, जंगलव्याप्त गावांना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे, या परिसरातील वाघांचे इतर ठिकाणी स्थलांतर करणे, जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून सावली तालुक्याचा समावेश करणे, इकोटूरिझम म्हणून या परिसराच्या विकासाकरीता निधी उपलब्ध करून देणे, वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे जंगलाच्या लगत असलेल्या शेतात शेती करता येत नसल्याने शेतक-यांना प्रति एकर दहा हजार रुपये अर्थसहाय्य करणे, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून 150 गावांचा यात समावेश करणे आदी मागण्या पालकमंत्र्यांनी केल्या.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यातील संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणाऱ्या योजनेच्या मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावासही त्यांनी मंजूरी दिली. जन वन विकास योजनेअंतर्गत सध्या 939 गावांचा समावेश असून योजनेत आणखी काही गावांचा समावेश करण्यात यावा. ज्या गावाजवळ वाघांचा सातत्याने वावर आहे आणि त्यामुळे शेती करता येत नाही, अशा शेतजमिनीमध्ये बांबू लागवड, फळझाड लागवड, चारा लागवड करण्याचे नियोजन करावे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत वनालगत असलेल्या पाच संवदेनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे. चंद्रपूर जिल्ह्यात 218 ठिकाणी सोलर बोअरवेल तयार करून त्यावर खोदतळे निर्माण करावेत. जेणेकरून या पाणवठ्यामुळे वन्यजीवांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, असे सांगून यासाठी लागणारा सहा कोटी रुपयांचा खर्च
कॅम्पा निधीतून करण्यात यावा, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,  प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये उपस्थित होते. तर प्रधान मुख्य वन संरक्षक- वनबल प्रमुख जी. साईप्रकाश, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. प्रविण, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे दूरदृष्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते.