वाढविण्यासाठी निर्यातदारांनी प्रयत्नशील राहावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन व निर्यात

वाढविण्यासाठी निर्यातदारांनी प्रयत्नशील राहावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे निर्यातदारांचे संमेलन

चंद्रपूर दि. 24 सप्टेंबर : चंद्रपूर हा भात उत्पादक जिल्हा आहे. शासनाच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील भात पिकाचे उत्पादन व त्याची निर्यात वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हयात निर्यात प्रचलन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील भाताचे उत्पादन व निर्यात वाढविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एन.डी. हॉटेलमध्ये आयोजित निर्यातदारांच्या संमेलनाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.      यावेळी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास केंद्राचे सहाय्यक संचालक वाय.सी. बघेल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने भारत सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम सुरू केला आहे. या महोत्सवाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील उद्योजक, राईस मिल ऑनर व उद्योगपती  यांचा सहभाग निर्यातीमध्ये जास्तीत जास्त वाढावा त्यासाठी निर्यातदाराचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2021 पासून ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत आणि त्यानंतर देखील देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची उजळणी व्हावी व एकंदरीत भारताचे सांस्कृतिक वैभव सर्वांसमोर आणण्याकरीता हा महोत्सव सुरू केला आहे. यामध्ये उद्योगपतींचा, संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे.
देशातील निर्यातदारांचा सहभाग वाढविण्याकरीता केंद्र शासन वेगवेगळ्या योजना राबवित असते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, आंतरराष्ट्रीय व्यापारात देशाचा वाटा किती, यावरून देशाची आर्थिक परिस्थिती अवंलबून असते. त्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्याने उत्पादीत केलेला माल निर्यात केला तर देशाचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल. केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या संस्था आहेत ज्यामध्ये निर्यातदारांना प्रोत्साहित करून वेगवेगळ्या यंत्रणांसोबत समन्वय साधता येतो.  या समन्वयातून आपल्या जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि आपल्या राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावता येईल, हा या अमृत महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी सूक्ष्म व लघु मध्यम उद्योगाचे सहाय्यक संचालक श्री. बघेल म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात तांदळाचे उत्पन्न अधिक असून त्याचे उत्पादन वाढवून निर्यात देखील वाढवता येऊ शकते. यासाठी जागा खरेदी पासून तर माल निर्यात करण्यापर्यंत सूक्ष्म व लघु, मध्यम विभाग निर्यातदारांना मदत करेल. याचा जास्तीत-जास्त फायदा जिल्ह्यातील निर्यातदारांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी केले. कार्यक्रमाला उद्योजक, विविध उद्योगांचे प्रतिनिधी तसेच बँकर्स उपस्थित होते.