मद्य विक्रीची अनुज्ञप्ती विहीत कार्यपध्दती अनुसरुन बंद करण्यात येणार- मंत्री शंभुराज देसाई

मद्य विक्रीची अनुज्ञप्ती विहीत कार्यपध्दती अनुसरुन बंद करण्यात येणार- मंत्री शंभुराज देसाई

 

मुंबई, दि.१४ : एखाद्या वार्डामध्ये स्थानिकांना दारुबंदी करावयाची असल्यास नगरपरिषद, महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या वार्डातील २५% पेक्षा अधिक महिला मतदार किंवा एकुण मतदार यांनी लेखी निवेदन देऊन संबंधित वार्डातील मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याची मागणी केल्यास, अशा अर्जाची पडताळणी करण्यात येईल. यानंतर विहीत कार्यपध्दती अनुसरुन गुप्त पध्दतीने मतदान घेण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. संबंधित वार्डातील एकुण मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या किमान ५० % पेक्षा अधिक अनुक्रमे एकुण मतदार किंवा महिला मतदार यांनी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याच्या बाजुने मतदान केल्यास त्या क्षेत्रात मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

 

याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

मंत्री श्री.देसाई म्हणाले, महानगरपालिकेच्या ठरावाद्वारे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद करण्याची तरतूद सदर आदेश व अधिसुचनेमध्ये नाही. तसेच, परवाना कक्ष अनुज्ञप्ती मंजूर करतेवेळी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील ना-हरकत घेण्याची तरतूद प्रचलित नियमात नसल्याने पुर्वाश्रमीचे खारघर ग्रामपंचायतीमध्ये हद्दीमध्ये दारुबंदी नियमानुसार करण्यात येणार असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले.