अवैध रेतीच्या लिलावातून 60 लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त

अवैध रेतीच्या लिलावातून 60 लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त

चंद्रपूर दि. 9 सप्टेंबर : अवैधरित्या होणा-या रेतीच्या वाहतुकीवर प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले असून रेती तस्करांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव करून शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा केला जात आहे.
वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना अवैध रेतीसाठयाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नीलेश पांडे यांच्यासमवेत मौजा पाटाळा, तालुका भद्रावती येथील रेती घाटावर छापा मारून 3059 ब्रास एवढा अवैध रेतीसाठा, एक जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. सदर रेतीसाठा उमेश पुरुषोत्तम बोडेकर व दिनेश पुरुषोत्तम बोडेकर यांच्या मालकीच्या शेतात आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी सदर जप्त करण्यात आलेल्या अवैध रेती साठ्याचा लिलाव वरोरा, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या दालनात करण्यात आला. सदर लिलाव प्रक्रियेत एकूण सहा लोकांनी सहभाग घेतला. सदर लिलावाची अपसेट प्राईस 32 लक्ष 76 हजार 189 रुपये ठेवण्यात आली होती. त्यापैकी भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील सचिन ढोरे यांनी रुपये 60 लक्ष रुपयांची सर्वोच्च बोली लावल्याने सदर रेतीसाठा सचिन ढोरे यांना देण्यात आला. त्यामुळे 60 लक्ष रुपये एवढा महसूल शासनास प्राप्त झाला. लिलावाची संपूर्ण प्रक्रिया भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी पार पाडली.