भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण मिशन माहची सुरुवात

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण मिशन माहची सुरुवात

  • कुपोषण मुक्त भारतासाठी महिनाभर विविध उपक्रमाचे आयोजन

  • विशेष कार्यक्रमात शुभारंभ

        भंडारा,दि.2:- सुपोषित भारताची संकल्पना (कुपोषण मुक्त भारत) प्रत्यक्षात अंमलात आणण्याकरिता आणि अंगणवाडी सेवा लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याकरीता सप्टेंबर 2021 हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून भंडारा जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासन स्तरावरून प्राप्त झालेल्या चार संकल्पना या महिन्याभरात राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यांमध्ये पोषण अभियान अंतर्गत पोषण माह कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात करण्यात आले. उदघाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरीक्त जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, उपजिल्हाधिकारी संदीप भस्के, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग मनीषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यावेळी उपस्थित होते.
पहिला आठवडा (पोषण वाटिका)
            पहिला आठवडा हा पोषण वाटिका म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी मायग्रेशन सॉफ्टवेअर आणि पोषण ज्ञान पोर्टल चे उद्घाटन करण्यात येईल. अशासकीय संस्थेमार्फत ऑनलाईन पाक कृती स्पर्धांचे प्रदर्शन व उद्घाटन, ग्रामस्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, एएनएम, आशा, ग्रामपंचायत, पोषण पंचायत यांच्या स्तरावर रॅली काढून पोषण महिन्याचा शुभारंभ होईल. अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती तथा इतर सार्वजनिक जागांवर वृक्षारोपण करून पोषण वाटिका तयार करण्यात येतील. अंगणवाडी सेविका मार्फत परसबाग तयार करण्याचे प्रात्यक्षिक, अंगणवाडी परिसरामध्ये पोषण वाटिका बाबत जनजागृती, गर्भवती महिलांसाठी पोषण आहार- घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा होईल, प्रत्येक अंगणवाडी केंद्रासाठी पोषण वाटिका स्पर्धेचे आयोजन, अंगणवाडी केंद्रांसाठी पोषण वाटिका स्पर्धा आयोजित केल्या जातील. कोविड लसीकरणाच्या जनजागृती करिता दोन दिवसाचे विशेष शिबीर आणि विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन तसेच मातृवंदना सप्ताह याच आठवड्यात संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.
दुसरा आठवडा
राष्ट्रीय पोषण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शंभर टक्के कोविड लसीकरण करून घेणे, गर्भवती व स्तनदा मातांसाठी लसीकरण शिबीर आयोजित करणे, गर्भवती महिलांसाठी ॲनिमिया तपासणी उपचार आणि समुपदेशन करणे, तिसऱ्या तिमाहीतील गर्भवती महिलांसाठी एका तासाच्या आत स्तनपान विषयी ऑनलाईन मार्गदर्शन करणे, गृहभेटिच्या माध्यमातून गर्भवती महिलांसाठी पोषण आहार आणि लोह व फॉलिक ॲसिडच्या सेवना बाबत मार्गदर्शन करणे, अंगणवाडी सेवांच्या लाभार्थ्यांकरिता जसे गरोदर महिला, बालके, किशोरी मुले यांना आरोग्य व पोषण यांच्या दृष्टीने योगाचे प्रशिक्षण आयोजित करणे, अंगणवाडी लाभार्थी लक्षगट जसे गर्भवती महिला, शालेय मुले, किशोरवयीन मुली यांच्यासाठी योगा प्रशिक्षण आयोजित करणे, शासकीय तथा अशासकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पाच मिनिटे योगा प्रोटॉकाल प्रशिक्षण देणे, महिला व मुलांसाठी कमी कालावधीत ऑनलाईन योग प्रशिक्षण, गर्भवती महिलांसाठी पोषण आहार, पाककृती स्पर्धा, गर्भावस्थेतील ॲनिमिया कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविका मार्फत शिबिर आयोजित केले जातील.
तिसरा आठवडा (पोषण साधनसामग्रीचे वाटप)
राष्ट्रीय पोषण मिशन महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पोषण साधनसामग्रीचे वाटप करण्यात येणार आहे.  तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी ऑनलाईन पूर्व शालेय शिक्षणाच्या कृतीचे आयोजन करणे, शंभर टक्के लाभार्थ्यांचे तरंग  सुपोषित महाराष्ट्र या पोर्टल वरती रजिस्ट्रेशन आणि जनजागृती करणे,  सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य व पोषण विषयक ऑनलाईन शिबिरे घेऊन जनजागृती करणे, पहिल्या व दुसऱ्या तिमाहीतील गर्भवती महिलांसाठी आहारातील विविधता या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणे, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) व जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचे पोषण महा बाबत आढावा बैठक आयोजित करणे. राजमाता जिजाऊ मिशन यांच्या सहयोगाने पोषण महा दरम्यान नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रमाचे आयोजन करणे. अंगणवाडी लाभार्थ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पोषणविषयक साधनसामुग्री वाटप करणे,  आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आयुष्य विभागाचे आईसी साहित्याचे वाटप करणे, स्थानिक पोषण आहार विषयक जनजागृती करणे तसेच टीएचआर पाककृतीचे अंगणवाडी सेविका मार्फत लाभार्थ्यांच्याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करणे, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पोषक पाककृतींचे अंगणवाडी सेविका मार्फत जनजागृती करणे तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध पोषण अन्नधान्याच्या पाककृतींचे प्रदर्शन आदि उपक्रम राबविण्यात येणार आहे.
चौथा आठवडा
          आठवड्यामध्ये तीव्र कुपोषित (एस.ए.एम) मुलांना शोधून पोषक आहाराचे वाटप करणे, प्रकल्पनिहाय तीव्र कुपोषित मुलांची शोधमोहीम आणि संदर्भ सेवा राबविणे, त्यांना पोषक आहाराचे वाटप करणे तसेच जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, वस्ती स्तरावर तीव्र कुपोषित मुले शोधण्याबद्दल जनजागृती करणे, गर्भवती महिलांकरिता प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करणे, मुलांमधील कुपोषण याविषयी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणे,  “माझे मुल माझी जबाबदारी” यावर आधारित कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या मुलांची तपासणी आणि उपचार करणे, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या मार्फत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करणे तसेच महिला व बालविकास विभाग व युनिसेफ यांच्या वतीने उत्कृष्ट बालविकास प्रकल्प अधिकारी, उत्कृष्ट अंगणवाडी सेविका यांच्या करता गौरव सोहळा आयोजित करणे आदी विविध उपक्रम कोविड 19 संबंधित शासनाचे सर्व नियम पाळून महिनाभराच्या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.
    1 सप्टेंबर पासून संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण मिशन महिना म्हणून राबवण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय पोषण महिना यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.