चंद्रपूर: आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार

आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार

लवकरच आठवडी बाजार सुरू होतील – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आश्वासन

राज्‍यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर दुसऱ्या लाटे दरम्यान लागु करण्‍यात आलेल्‍या निर्बंधा पासुन आठवडी बाजार बंद करण्‍यात आले आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्‍यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे आठवडी बाजारावर ज्‍यांचा उदरनिर्वाह‍ अवलंबुन आहे अशा छोटया – मोठया व्‍यावसायीकांचा व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्‍वरीत आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या कड़े केली आहे.राज्य सरकारचे मार्गदर्शन मागवुन आठवडी बाजार सुरू करण्‍यात येतील असे आश्‍वासन श्री. गुल्हाने यांनी आ. मुनगंटीवार यांना दिलेले आहे.

राज्‍यात रुग्ण संख्येत , मृत्यु संख्येत मोठया प्रमाणावर घट झाली आहे. रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण तसेच निमशहरी भागातील नागरिकांसाठी अतिशय जिव्‍हाळयाचा समजला जाणारा आठवडी बाजार मात्र अद्याप सुरू झालेला नाही. अद्याप आठवडी बाजार बंद असल्‍यामुळे यावर अवलंबुन असलेल्‍या व्‍यावसायीकांना व्‍यवसायाअभावी आर्थीक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. त्‍याचप्रमाणे नागरिकांना सुध्‍दा गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता आठवडी बाजार सुरू करण्‍याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली आहे.