मनपातर्फे विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार डेंग्यु जनजागृती देण्यात येणार स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड

मनपातर्फे विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार डेंग्यु जनजागृती
देण्यात येणार स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड

चंद्रपूर ०३ ऑगस्ट  – राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु प्रतिरोध मोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले जाणार असुन याद्वारे मुख्याध्यापक,शिक्षक, शालेय विद्यार्थी व पर्यायाने सर्व घरी कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती केली जाणार असल्याची माहीती आयुक्त विपीन पालीवाल यांनी आढावा बैठकीत दिली.
मनपा क्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची डेंग्यु जनजागृती संबंधी बैठक मनपा सभागृहात ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त अशोक गराटे, डॉ वनिता गर्गेलवार उपस्थित होते.
डेंग्यु व इतर कीटकजन्य आजाराचा प्रसार होऊ नये या दृष्टीने ८ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर पर्यंत सदर मोहीम राबविण्यात येत असुन विद्यार्थी पालकांच्या मदतीने घरी उत्पत्ती होऊ शकणाऱ्या डासांना आळा घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटी कार्डद्वारे शिक्षकगण यावर नियंत्रण ठेवणार असुन विद्यार्थ्यांना यात राबवायची सर्व कार्ये ही पालकांच्या उपस्थितीतच करावयाच्या आहेत. आठवड्यातुन एक दिवस पालकांच्या मदतीने पाणी साठवलेली भांडी तपासणे, कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी तपासणे, डासअळी आढळल्यास पालकांच्या मदतीने भांडे कोरडे करणे व कापडाने पुसुन घेणे इत्यादी कार्यांद्वारे डासोत्पत्ती स्थाने नष्ट केली जाणार आहेत.
पावसाळा सुरु होताच डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार होण्यास सुरवात होते. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात २५ ब्रिडींग चेकर्स, ३५ एएनएम, ७ एमपीडब्लु व १६० आशा वर्कर तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
२०२१ मध्ये पालिका क्षेत्रात २४८ डेंग्यु रुग्ण आढळले होते, रुग्णांची ही संख्या बघता २०२२ मध्ये मनपाद्वारे युद्धस्तरावर प्रतिबंध मोहीम राबविण्यात आल्याने २०२२ मध्ये डेंग्यु रुग्णांची संख्या केवळ १७ आढळुन आली होती. त्यामुळे यावर्षीसुद्धा डेंग्यु प्रतिबंधक मोहीम राबविण्यात येत असुन सर्वांचे सहकार्य यात अपेक्षित आहे.
शहरातील सर्व शासकीय तसेच खाजगी शाळांमध्ये स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड मोहीम सुरु होणार असुन संपुर्ण शाळांचा यात सहभाग असावा या दृष्टीने मनपा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. ३० ऑक्टोबर रोजी मोहीम संपल्यावर शालेय विद्यार्थी आपले स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड वर्ग शिक्षक यांच्याकडे जमा करतील, शिक्षकांच्या माध्यमातुन आरोग्य विभागाकडे सदर माहीती जमा करण्यात येईल. यानंतर लकी ड्रॉ द्वारे मनपातर्फे पहिले शाळास्तरावर स्कुल बॅग,वाटर बॉटल,टिफिन बॉक्स व नंतर महानगरपालिकास्तरावर सायकल, मोबाईल टॅब व ट्रॉली बॅग या स्वरूपाची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
डेंग्युसंबंधी आवश्यक ती  सावधगिरी बाळगण्यासाठी स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड मोहीम आपल्या शाळांमध्ये सुरु करण्याचे तसेच शिक्षक पालक बैठकीद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांच्याद्वारे सर्व शाळांना करण्यात येत आहे.