भंडारा : जिल्ह्यातील गर्भवती महिला व स्तनदा मातांकरिता प्रधानमंत्री मातृ वंदना योजना बँक खाते उघडण्यासाठी विशेष शिबीर

जिल्ह्यातील गर्भवती महिला व स्तनदा मातांकरिता

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

  • बँक खाते उघडण्यासाठी विशेष शिबीर

            भंडारा,दि.29:- भंडारा जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत व प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. अशा गर्भवती महिला व माता कुपोषित असून त्यांच्या व त्यांचे नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून जिल्ह्यातील मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होत आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा. यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने “प्रधानमंत्री मातृ वंदना’’ ही योजना संपूर्ण देशात 1 जानेवारी 2017 पासुन कार्यान्वित करण्यात आली आहे.   

    या योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसुती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाचे अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशा पात्र महिलांना गरोदर काळात माता, शिशू सुदृढ व निरोगी राहावे व गरोदर मातांना सकस आहार घेता यावा याकरिता केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जिवीत अपत्यापूर्तीच मयादित आहे व सदर लाभ एकदाच घेता येईल. नैसर्गीक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्माला आल्यास त्या टप्प्यापुताच लाभ एकदाच अनुज्ञेय राहील. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत गर्भवती महिलांना नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी महिलेच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफीस मधील खात्यात (DBT) मार्फत केंद्र शासनाकडून जमा करण्यात येईल.

भंडारा जिल्ह्यातील ज्या मातांचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते नाही, अशा गरजू मातांचे बँकेत किंवा पोस्टात खाते उघडण्याकरिता जिल्हास्तरीय सुकाणू समितीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय रूग्णालयात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर मातेचे इंडियन पोस्ट पेमेन्ट बँक (पोस्ट ऑफिस) मार्फत खाते उघडण्याचे शिबीर 2 ऑगस्ट 2021 पर्यंत तसेच प्रा.आ.केंन्द्र ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी ज्या गरोदर मातांकडे बँक खाते नाही किंवा ज्यांना नविन बँक खाते उघडण्याची ईच्छा आहे त्यांनी आपल्या नजिकच्या प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे भेट देऊन आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.