गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

-तुटपुंज्या मानधनावर असलेल्या कंत्राटी कर्मचारी वर्गांच्या झाल्या बदल्या

बातमी संकलन – पंकज चहांदे

गडचिरोली- रोजगाराची हमी असलेल्या रोजगार हमी योजना शाखेतील गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात गेले असून जिल्ह्यातील महोदयांनी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा चालवला आहे.
रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता जिल्ह्यात जिल्हास्तर, तालुकास्तर व पंचायत स्तरावर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्ह्यातील रोजगार हमी शाखेमध्ये विविध पदावर कंत्राटी कर्मचारी वर्ग सध्या स्थितीत कार्यरत असून सर्वजण आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतांना दिसून येत आहेत. यामध्ये तांत्रिक पॅनल अधिकारी,ज्युनिअर अभियंता ५६, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी १७, डॉटा एंट्री ऑपरेटर ४२ असे एकूण ११५ कंत्राटी कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत आहेत. सर्वांच्या बऱ्याच वर्षांपासून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती करतेवेळी तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांना सर्वात अगोदर नियुक्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट असतांना सुद्धा गडचिरोली येथील महोदयांनी कंत्राटी कर्मचारी वर्गांची बदली करणे सुरू केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य तर सोडा हल्ली जी अवस्था झाली आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तुटपुंज्या मानधनावर कसे-बसे उदरनिर्वाह करून आज संसाराचा गाडा कंत्राटी कर्मचारी हाकत आहेत. कित्येकांनी याच भरवशावर राहून संसारे उभे केली. अशातच बदलीचे सत्र यामुळे मानसिक त्रास होऊन तुटपुंज्या मानधनावर घरभाडे, वीज बिल, राहणीमान भत्ता अशा कुठल्याही प्रकारची सवलत कर्मचाऱ्यांना दिली जात नसल्याने काय करावे? असा प्रश्न जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. यामध्ये सर्वात मोठी भर म्हणजे शेकडोंच्यावर कंत्राटी कर्मचारी वर्ग असूनही भविष्य निर्वाह निधी (पीएफ) लागू नाही. केव्हा-केव्हा तर दोन ते तीन महिने लोटूनही मानधन मिळत नसल्याने “ना घर के ना घाट” के अशी अवस्था झाली आहे.
खरे म्हणजे जे काही नवीन करायचे झाले तर सर्वात अगोदर गडचिरोली जिल्हा महोदयांना सापडतो की काय? असे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून यापूर्वी ज्या ठिकाणी कर्मचारी वर्ग कार्यरत होते त्याच ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्याच्या मागणीचा सूर कंत्राटी कर्मचारी वर्गांकडून धरू लागला आहे.