महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा : 1 ते 12 जानेवारी जिल्ह्यात 4 क्रीडा प्रकाराचे आयोजन  

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा : 1 ते 12 जानेवारी जिल्ह्यात 4 क्रीडा प्रकाराचे आयोजन  

 

नागपूर, दि. 28 : राज्यात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे 1 ते 12 जानेवारी 2023 या दरम्यान आयोजन करण्यात येत असून 39 क्रीडा प्रकारांमधून या स्पर्धा होत आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे, जिल्ह्यातील बारामती तालुक्यात ए.एम.आय. गोरपडी, पुना क्लब येथे तसेच राज्यात इतर जिल्हयात नागपूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अमरावती व मुंबई या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या स्पर्धेतील बॅडमिंटन, हॅण्डबॉल, नेट बॉल व सेपक टेकरा या चार क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त संपूर्ण राज्यात वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता जनसामान्यांना ज्ञात होण्याच्या दृष्टीने नागपूर येथून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्यतेने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन 30 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता करण्यात आले आहे.

 

राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून 1 लाख 4 हजार 56 खेळाडू, पंच, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी, स्वयंसेवक व पदाधिकारी यांचा समावेश यात असणार आहे. यास्पर्धेत 39 क्रीडा प्रकारांमध्ये 1 हजार 75 सुवर्ण पदक, 1 हजार रौप्य व 1 हजार 450 कांस्य पदकांसाठी खेळाडू प्राविण्यपणाला लावणार आहे.

 

यावेळी 30 डिसेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त नागपूर शहरातून काढण्यात येणाऱ्या क्रीडा ज्योत रॅली विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून निघून पागलखाना चौक, पोलीस तलाव चौक, काटोल नाका चौक, सेमीनार हिल्स, जापानी गार्डन चौक, हायकोर्ट चौक, लेडिज क्लब, एम.एल.ए. होस्टेल, लॉ कॉलेज, लक्ष्मी भवन, शंकर नगर चौक, बजाज नगर चौक, दिक्षाभूमी या ऐतिहासिक स्थळी भेट, रहाटे कॉलनी चौक व अजनी चौक, वर्धा रोडद्वारे समृध्दी मार्गाने पुणेकडे रवाना होईल.