“चला जाणुया नदीला” अभियानात जिल्ह्यातील चुलबंद व वैनगंगा नदीचा समावेश

“चला जाणुया नदीला” अभियानात जिल्ह्यातील चुलबंद व वैनगंगा नदीचा समावेश

 

भंडारा, दि. 13 : वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामूळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढत चालला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये व जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता व साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी “चला जाणुया नदीला” हे अभियान शासनाने सुरू केले आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील चुलबंद व वैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी सेवाग्राम जि.वर्धा येथून झाला असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.

आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणूया नदीला” अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपवनसंरक्षक तथा सदस्य सचिव “चला जाणूया नदीला” अभियान राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक य. भा. नागूलवार, उपविभागीय अधिकारी, तुमसर, बी. वैष्णवी, उपविभागीय अधिकारी, साकोली मनिषा दांडगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी संजय मुडपल्लीवार, पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बेले, सहाय्यक गटविकास अधिकारी ए.के. गिऱ्हेपुंजे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रा.ल. गजभिये, फिड फाऊंडेशन व नदी समन्वयक दिलीप पंधरे, उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.एम. शिवणकर, जि.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

“चला जाणुया नदीला” अभियानामध्ये शासनाच्या एकुण 27 विभागांचा सहभाग असणार आहे. या अभियानाची व्यापक प्रसिद्धीसाठी शाळांमध्ये सुद्धा जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अभियानाच्या अनुषंगाने गावाच्या नागरी क्षेत्राची माहिती, टंचाईग्रस्त गावांची यादी, पुरप्रवण व वनक्षेत्रात असलेली गावांची यादी, पाझर तलाव साठवण तलावांची यादी, जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय, बीएमसी स्थापित झालेली ग्रामपंचायतींची यादी, नद्यांचे नकाशे, जिल्हातील पर्यटन व धार्मिक स्थळांची, मल व जल निस्सारणाची माहिती, खाऱ्या व गोड्या पाण्याची माहिती, नद्यांची व प्रदूषणांची माहिती दिनांक 20 डिसेंबर 2022 पर्यंत संबंधीत विभागांना सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

 

“चला जाणुया नदीला” या उपक्रमामध्ये नदी संवाद अभियानाचे आयोजन, जनसामान्यांना नदी साक्षर करण्यासाठी उपाययोजना, नागरीकांच्या सहकार्याने नदींचा सर्वकर्ष अभ्यास, अमृत वाहीनी बनविण्यासाठी मसूदा तयार करणे, नदीचे स्वास्थ आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार प्रसार, नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्यजन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, नदी संवाद यात्रेचे आयोजन, अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करून आराखडा तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या