छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे 21 मे रोजी आयोजन

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे 21 मे रोजी आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

चंद्रपूर, दि. 19: कौशल्य उद्योजकता व नाविण्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 21 मे रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील होतकरू तरूणांसाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. सदर शिबीराचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

 

या कार्यक्रमात उमेदवारांना 10 वी, 12 वी नंतर शिक्षणाच्या वाटा, सीईटी/12 वी नंतर विविध अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील रोजगारांच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, पालक विद्यार्थी समुपदेशन, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारीत प्रशिक्षण व रोजगारांच्या संधी आदीबाबत मार्गदर्शन, व्यवसाय व करिअर संबंधित विषयाची माहीती तज्ञ मार्गदर्शकाकडून मिळणार आहे.

 

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर करिअर शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सत्रात उपस्थित राहण्याबाबत कळवावे व स्वत:उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवी मेंहेदळे यांनी केले आहे.