सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे- खासदार प्रफुल पटेल.

सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे- खासदार प्रफुल पटेल.

कार्यकर्ता जनसंपर्क मेळाव्याला संबोधन.

 

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.2 नोव्हेंबर:-राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, जनता सोबत असो वा नसो आम्ही मात्र सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांसाठी सदैव काम करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.ते येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दि.1नोव्हेंबर ला सायंकाळी 6.30 वाजता आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर,यशवंत परशुरामकर, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, किशोरी शहाणे, सुशीला हलमारे ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, राकेश लंजे,यशवंत गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न मालाला योग्य भाव मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत राहु. या परिसरातील शेतकऱ्यांच्या वरील विविध रोगाने धान पीकांचे जे नुकसान झाले, या बाबतीमध्ये शासन वेळोवेळी मदत करेल. आघाडी सरकार आपले आहे आणि आपले सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, ही आमची जबाबदारी आहे. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान साबित होणारी झाशीनगर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करणार असून, धान खरेदी ही सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे, धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही सुद्धा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील. शेतमालाला योग्य भाव देणे याला आमचे प्राधान्य असून सध्या केंद्रातील शासनाने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे खर्च वजा जाता 50 टक्के नफा देण्यात येईल असे सांगितले. परंतु आजपर्यंत कोणाला ते मिळालेले नाही. केंद्र सरकारने धाना साठी 868 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. परंतु मागील वर्षीपासून आम्ही 700 रुपयांचे बोनस देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला शेतकऱ्याच्या श्रमाला हातभार लावण्याचे काम आपण करत असल्याचं प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.यावेळी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी सुद्धा संबोधित केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोकपाल गहाणे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन उद्धव मेहंदळे यांनी केले.