रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या बूस्टर डोज भंडारा येथे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन- नरेंद्र भोंडेकर

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या बूस्टर डोज

भंडारा येथे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन- नरेंद्र भोंडेकर

भंडारा, दि. 12 : नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या कीटकनाशक मुक्त आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढी सोबतच अनेक व्याधींवर गुणकारी आहेत. रानभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. सध्या श्रावणात शेतशिवारात जंगलात अनेक ठिकाणी रानभाज्या बहरल्या आहेत. अनेक महत्वपूर्ण जीवनसत्व असलेल्या रानभाज्यांकडे अनेकांचा कल वाढला आहे. कोणत्याही औषधाची फवारणी न करता बांधावर उगवलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगली ओळख आहे. या रानभाज्यांचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग भंडारा व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), भंडारा अंतर्गत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिव्हिल लाईन, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी रानभाजी महोत्सवाचे उदघाटन करताना आमदार नरेंद्र भोंडेकर बोलत होते. महोत्सवात आमदार नरेंद्रभाऊ भोंडेकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत सभापती रत्नमाला चेटूले, जिल्हा परिषद सदस्य विनोद बानते, अतिरिक्त जिल्हाधिकारी भुगावकर, निवासी जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरूण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषि अधिकारी अविनाश कोटांगले, भंडाराचे तंत्र अधिकारी योगेश राऊत, तसेच ग्रामिण जीवोन्नती अभियान भंडाराच्या महिला गट व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवात रानातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या जवळपास 47 प्रकारच्या रानभाज्या व त्यांची पाककृती प्रदर्शनामध्ये ठेवून त्यांचे महत्त्व तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी समजावून सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण बलसाने यांनी रानभाज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असून विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिकरित्या येत असून यावर कसल्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी करण्यात येत नाही. यामुळेच अत्यंत पौष्टिक असल्याने या रानभाज्या सकस असल्याचे सांगितले.

रानभाज्यांचे आहारातील महत्व तांदुळजा भाजी ‘क’ व ‘अ’ जीवनसत्व विपुल असून रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी उपयुक्त. उष्णता व दाह कमी करते, मलावरोध दूर करते. फांद भाजी ही वेल वर्गीय असून याची पाने खाद्य असतात. पित्तविकार दूर करणारी, निद्रा येण्यासाठी उपयुक्त आहे. अंबाडी भाजी क’ व ‘अ’ जीवनसत्व, लोह, झिंक, कैल्शियम यात विपुल प्रमाणात असतात. गुणाने असून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. म्हैसवेल भाजी ‘अ’ जीवनसत्व वाढवणारी, पोटाच्या विकारात लाभदायी आहे.