गडचिरोलीत 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान “कृषी रानभाजी महोत्सव” आयोजित 

गडचिरोलीत 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान “कृषी रानभाजी महोत्सव” आयोजित 

गडचिरोलीकरांसाठी रान भाज्यांची मेजवानी

गडचिरोली, दि.02: स्थानिक नागरीकांना, तसेच शेतकरी बांधवांना रानभाजी ओळख त्यांचे उपयोग आणि महत्व कळावे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी गडचिरोलीत ‘कृषी रानभाज्या महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. वनविभाग, आत्मा, कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र, माविम आणि उमेद यांचे संयुक्त विद्यमाने गडचिरोली वन वसाहतीमधील शिल्पग्राम प्रकल्प येथे दिनांक 05 ते 07 ऑगस्ट दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 05 वाजेच्या दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. सदर महोत्सवात विविध प्रकारचे 30 स्टॉल उभारले जाणार असून त्यात प्रामुख्याने महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार असल्याने 04 ऑगस्ट पर्यंत वनविभाग गडचिरोली कार्यालयात भेटुन आपले नांव नोंदणी करण्याचे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. त्याव्यतिरिक्त वनविभाग, कृषी विभाग, आत्मा, माविम इत्यादी विभागाचे स्टॉल देखील उभारले जाणार आहेत.

रानभाज्या प्रदर्शनासोबतच सदर महोत्सवात सहभागी होणाऱ्यांसाठी सर्व विभागांमधील विविध योजनांची माहिती तसेच प्रक्रिया युक्त पदार्थ उपलब्ध असणार आहेत. शिवाय या महोत्सवादरम्यान खास शेतकरी बांधवांकरीता तीन दिवस तांत्रिक मार्गदर्शन शिबीर देखील आयोजित करण्याचे नियोजीत आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्याव असे आवाहन गडचिरोली वन विभागाकडून करण्यात आले आहे.