वाचनप्रेरणा दिनी जागतिक कीर्तीच्या वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन

वाचनप्रेरणा दिनी जागतिक कीर्तीच्या वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन

·         स्थानिक ला.ब.शा.चा उपक्रम

भंडारा, दि. 16: वाचन प्रेरणा दिनास कुसुमाग्रज प्रतिष्ठान  यांच्याकडून प्राप्त झालेल्या शंभर पुस्तकांच्या पेटीचे उद्घाटन स्थानिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयात दिमाखात पार पडले.

जिल्हा मराठी भाषा समितीच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात   वाचनकक्ष निर्माण करावा व संग्रहात उत्तमोत्तम वाचनीय पुस्तकांची भर घालावी असा निर्णय घेण्यात आला.त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या सौजन्याने शंभर पुस्तकांच्या दोन पेट्या उपलब्ध झाल्या त्यातलीच एक पुस्तकपेटी लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या मराठी भाषा समितीस वाचनप्रेरणादिनी सुपूर्द करण्यात आली.

भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी या पुस्तकपेटीचे शानदार उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी जागतिक ख्याती प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत गोडबोले व सासवडचे पक्षी मित्र निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे,अनघा पुरंदरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन शाळेत आयोजित करण्यात आले.दोन्ही वक्त्यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी श्रोते  मंत्रमुग्ध झाले. वाचनाचे फायदे पक्षी जगतातल्या घडामोडी व विविध पक्ष्यांचे आवाज व ओळख वक्त्यांनी फार खुमासदार रितीने करुन दिली. जागतिक कीर्तीचे वक्ते असल्याने श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे कसब त्यांच्यात होतेच. टाळ्यांच्या कडकडाटाने विद्यार्थ्यांनी पण उस्फुर्तपणे दाद दिली.

            प्रमुख अतिथी रुपात शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे,नागलोते, हे होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालत व लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रारंभी एपीजे अव्दुल कलाम साहेब यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. शाळेच्या वतीने प्राचार्या मंदा चोले यांनी सर्व अतिथीचे पुस्तक देऊन स्वागत केले.

जिल्हा ग्रंथालय कार्यालयाकडून याप्रसंगी जिल्हा ग्रंथालयाचे सदस्यत्व देण्यात आले. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठीच्या अनेक योजना जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे यांनी प्रास्ताविकात सांगीतल्या. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन इयत्ता नववी च्या विद्यार्थिनी डिंपल भिवगडे, नेहांशी रामटेके या नववीच्या  दोन विद्यार्थिनींनी केले.

श्रुणाल धकाते  या विद्यार्थ्याने पाहुण्यांचा परिचय करुन दिला.

मी अब्दुल या स्वरचित कवितेचे वाचन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सारिका वालदे हिने केले. साहिल ढोक  या दहावीच्या  विद्यार्थ्याने  फलकावर एपीजे अब्दुल कलाम यांचे चित्र चितारले होते ते चित्र लक्षवेधक ठरले. या प्रसंगी तमन्ना शेंदरे, नितीश भिवगडे या विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता नववीचे वर्ग शिक्षक दिपिका बांते,हेमराज टिचकुले,यांनी प्रयत्न केले. मराठी भाषा समिती प्रमुख स्मिता गालफाडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात वाचनकक्षाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षक पांडुरंग कोळवते,चोपराम गडपायले व स्वयम शहारे,आशिका कहालकर,गौरव मल्होत्रा,तमन्ना शेंदरे हे विद्यार्थी हजर होते. शाळेच्या प्राचार्या मंदा चोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यमक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी इयत्ता नववी व दहावीचे सर्व विद्यार्थी या उपस्थित होते.