कोरोना काळातील कृषी विभागाचे कार्य उल्लेखनीय  – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

कोरोना काळातील कृषी विभागाचे कार्य उल्लेखनीय  – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

  • उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

भंडारा,दि.16:- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असतांनाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य निभावल्यानेच राज्यात कुठेही फळांचा, भाजीपाल्याचा तुटवडा पडला नाही. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोना काळातील कोरोना योद्धे आहेत, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

            कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरात आयोजित रानभाजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपसंचालक अरुण बलसाने, भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, साकोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, विजय हुमने, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, उमेद व्यवस्थापक प्रिया सुखदेवे, शेतकरी भदू कायते, संजय एकापूरे, तानाजी गायधने, डुबेदास रामटेके यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाखणीचे तालुका कृषी अधिकारी पद्माकर गीदमारे, उत्कृष्ट फळबाग लागवडीसाठी कृषी सहाय्यक गोपाल मेश्राम, पहेल्याचे पर्यवेक्षक होमराज धांडे, एकोडीचे कृषी सहाय्यक संतोष नागलवाडे, किन्हीचे के. एच. परशुरामकर, लाखांदूरचे वि. भा. शिवणकर, भिलेवाडाचे कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, गुंथाराच्या मीनाक्षी लांडगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

            यावेळी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांना रानभाज्यासाठी चांगले मार्केट असून या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी रानभाज्यांची पाहणी करून योग्य व्यवस्थापनाविषयी कृषी विभागाचे कौतुक केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी कोरोना काळातील कर्तव्य निभावतानाचे स्वतःचे व कर्मचाऱ्यांना आलेल्या अडचणींचे अनुभव कथन केले. उत्कृष्ट कार्य केल्यामुळेच जिल्ह्यात भाजीपाला, फळे योग्य पद्धतीने पुरवठा केल्याचे सांगितले.

            प्रास्ताविकातून भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी ज्या ज्या ठिकाणी भाजीपाल्याची गरज होती त्या त्या ठिकाणी स्वतः व कृषी सहाय्यकांना भाजी पोचवतानाचे अनुभव कथन केले. संचालन कृषी पर्यवेक्षक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी मानले.