मनपाने केली माझी माती माझा देश अभियानाची सुरवात क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना करण्यात आले वंदन

मनपाने केली माझी माती माझा देश अभियानाची सुरवात
क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना करण्यात आले वंदन

चंद्रपूर ९ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ऑगष्ट क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली तसेच ९ ते ३० ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या माझी माती, माझा देश’ या देशव्यापी अभियानाची सुरवातही करण्यात आली.
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र, माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व राज्यगीत म्हणण्यात आले. याप्रसंगी शासन निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी हातात माती घेऊन ‘गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण प्रतिज्ञा घेत सेल्फी काढली. तसेच ‘मिट्टी को नमन वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह वीर जवानांना वंदन केले तसेच मान्यवरांच्या हस्ते  ‘वसुधा वंदन’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे.यात पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक उभारले जाणार आहे
या कार्यक्रमास उपायुक्त अशोक गराटे,उपायुक्त श्री. मंगेश खवले, शहर अभियंता श्री. महेश बारई, मुख्य लेखाधिकारी श्री. मनोहर बागडे  यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.