मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे ३४४ नागरीकांचे रेस्क्यु

मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे ३४४ नागरीकांचे रेस्क्यु

एकुण ९९४ नागरीक सुरक्षीत स्थळी

०६ पाळीव प्राणी सुद्धा रेस्क्यु

चंद्रपूर १४ जुलै – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत ३४४ नागरीकांना रेस्क्यु ऑपरेशन अंतर्गत पूरग्रस्त भागातून सुरक्षीतरीत्या बाहेर काढण्यात आले आहे तर एकुण ९९४ नागरीकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे रात्री सुद्धा मोहीम चालवुन रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथील नागरीकांना सुरक्षीतरीत्या बाहेर काढले आहे तसेच पुररपरिस्थिती क्षेत्रामध्ये अडकलेले २ गायीचे वासरू व ४ कुत्री यांचाही बचाव करण्यात मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले आहे.

सदर नागरीकांना मनपाच्या महाकाली कन्या शाळा, माना प्राथमिक शाळा, शहिद भगतसिंग शाळा,महात्मा फुले शाळा, किदवई शाळा,जेष्ठ नागरिक संघ, अग्रसेन भवन, हिस्लाॅप शाळा,किदवई शाळा ,सरदार पटेल शाळा,लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा,पूर्व माध्यमिक शाळा,नागाचार्य मंदीर येथे स्थलांतरीत करण्यात आले असुन जेवण,पाणी, फिरते शौचालय तसेच वैद्यकीय सुविधा महानगरपालिकेमार्फत देण्यात येत आहेत.

हवामान खात्याद्वारे चंद्रपूर शहराला पावसाबाबत रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आयुक्त राजेश मोहीते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन पथक तयार ठेवण्यात आले होते,शिवाय संभाव्य परिस्थितीस तोंड देण्यासाठी प्रत्येक झोननिहाय २० सदस्यांचे राखीव पथकसुद्धा तयार करण्यात आले होते. पुराचा धोका असणाऱ्या भागात ध्वनिसंदेश, ऑटोद्वारे सतर्कतेचा इशाराही दिला गेला होता. मात्र यानंतरही जे नागरीक सुरक्षित स्थळी गेले नाही त्यांना बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले आहे.

शाळांमध्ये स्थलांतरित झlलेल्या नागरीकांची मनपा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येकला मास्क देण्यात असुन,ओआरएस झिंक तसेच सॅनिटायझर वाटप करण्यात येत आहे. तपासणी करून आरोग्य विषयक सल्ला तसेच आवश्यकता असल्यास औषधेही देण्यात येत आहेत.बचाव मोहीम सुरूच असुन पावसाचे प्रमाण पाहता मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.