‘ग्रॅज्युएट आणि मार्केट’ यामध्ये पूल बांधणे आवश्यक – अति. जिल्हाधिकारी वरखेडकर

 ‘ग्रॅज्युएट आणि मार्केट’ यामध्ये पूल बांधणे आवश्यक – अति. जिल्हाधिकारी वरखेडक

Ø मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर,दि. 8 जुलै : सध्या बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मोठमोठ्या उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. नोकरीकरीता पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यावर भर असल्यामुळे युवकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराभिमुख कौशल्य विकसीत होत नाही. त्यामुळे बाजाराची गरज लक्षात घेता ‘ग्रॅज्युएट आणि मार्केट’ यामध्ये पूल बांधणे आवश्यक आहे, असे मत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी व्यक्त केले.

मुंबई येथून ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास विभाग आणि संजीवनी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने लाईव्ह संजीवनी आर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, संजीवनी हॉस्पीटलचे डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी, डॉ. संध्या कुलकर्णी, डॉ. केतकी कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी श्री. कन्नाके, मुकेश गुंजनकर, एनआयसीचे सतिश खडसे आदी उपस्थित होते.

कोव्हीडच्या पार्श्वभुमीवर शासनाच्यावतीने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, कोव्हीड पश्चात जग हे पूर्णपणे वेगळे राहणार आहे. मानव जातीमध्ये अनेक प्रकारचे बदल आपल्या निदर्शनास येईल. पोस्ट कोव्हीड लक्षणे अतिशय जटील असण्याची शक्यता आहे. अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याकरीता या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात पहिल्या टप्प्यात 20 हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 600 जणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.

महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणाची उपयुक्तता बहुआयामी असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी अतिशय गांभिर्याने हे प्रशिक्षण करावे. या प्रशिक्षणाचा उपयोग स्वत:च्या निरोगी आयुष्यासाठी होणारच आहे, पण त्याहून महत्वाचे म्हणजे पोस्ट कोव्हीड पिडीतांना सेवा देतांना प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. शिवाय रोजगार निर्मिती होण्यासही मदत होईल. असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचे ऑनलाईन उद्घाटन मुंबई येथून करण्यात आले. त्याचे थेट प्रक्षेपण लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी तर संचालन वैष्णवी ताजणे-निमकर यांनी केले. कार्यक्रमाला संजीवनी हॉस्पीटलचे डॉक्टर्स,  नर्स, प्रशिक्षणार्थी यांच्यासह जिल्हा कौशल्य विकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.