गाळमुक्त धरणाची माहिती मिळणार अवनी ॲपवर

गाळमुक्त धरणाची माहिती मिळणार अवनी ॲपवर

 

भंडारा, दि. 25 मे : धरणातील गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी आणि तोच गाळ शेत शिवारात टाकून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेच्या कामावर अवनी ॲपद्वारे डिजीटल पद्धतीने सनियंत्रण ठेवण्यात येईल.

 

आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीद्वारे आढावा घेतला. या बैठकीमध्ये उपवनसंरक्षक राहुल गवई, कार्यकारी अभियंता अनंत जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कापगते यांच्यासह अशासकीय संस्थांचे आठ प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी धरणातील गाळ काढणे अपेक्षीत असून मुरूम काढू नये अशा सुचना श्री. कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या. ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेवून या योजनेची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी व शेतकऱ्यांची मागणी असल्यास त्या क्षेत्रातील धरणातील गाळ काढावा. अशासकीय संस्थांनी तांत्रिक दृष्ट्या अचुक काम करावे. या योजनेबाबत असलेल्या सर्व अटी शर्तींचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

 

भारतीय जैन संघटना (BJS) आणि केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालय व पंचायतराज मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार झाल्यानुसार राज्यस्तरावर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमध्ये संघटनेच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील जलसाठे पुर्नजिवीत करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात येत आहे.