chandrapur I पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण ; गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण ; गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा

चंद्रपूर दि. 28 मे : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व आरोग्य यंत्रणा अधिक बळकट व्हावी, तसेच रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 18 लक्ष रुपये खर्च करून सिंदेवाही नगरपंचायतीला एक तर सावली नगरपंचायतीला एक अशा दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, तहसीलदार गणेश जगदाळे, विस्तार अधिकारी श्री. घाटोळे, वैद्यकीय अधिकारी श्री.झाडे, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, विजय मुत्यलवार, संदीप गड्डमवार, बंडू बोरकुटे, दिनेश चिटनुरवार, सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील, न.प.मुख्याधिकारी मनीषा वझाडे, गटविकास अधिकारी निखिल गावडे प्रामुख्याने उपस्थित होते.

रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल. कोरोना महामारीचा कठीण काळ सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून रूग्णांच्या सेवेसाठी ती आजपासून उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत 18 लक्ष रुपये खर्च करून सिंदेवाही व सावली नगरपंचायतीना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.