chandrapur I शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेती विषयक कोणतीही उणीव भासू देता कामा नये : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेती विषयक कोणतीही उणीव भासू देता कामा नये : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर, दि.18 मे : शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे व खतांचा विहित वेळेत पुरवठा होईल, बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही तसेच शेतकऱ्यांना अधिकृत खते व बी-बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झूम दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार रामदास आंबटकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुभाष धोटे,आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रशांत मडावी तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी, पालकमंत्री म्हणाले की, पेरणीनंतर पावसाचा खंड, जोराचा पाऊस अथवा बियाण्याची उगवणक्षमता यामुळे काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीकाची उगवण कमी झाल्याचे निदर्शनास येते अशा परीस्थितीमध्ये दुबार पेरणी करावयाची झाल्यास दुबार पेरणीसाठी बियाण्याची उपलब्धता कशी होईल याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे. बियाण्याची उगवण क्षमता तपासणीसाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात बीजप्रक्रिया मोहीम राबवावी. शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड पद्धतीमध्ये बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाचा वापर करावा.

यावेळी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या क्षेत्रातील कृषीविषयक समस्या, आवश्यक खतांचा व बी-बियाण्यांची उपलब्धता, विजपुरवठा व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आदी विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.

खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी वरोरा-भद्रावती तालुक्यात मागील वर्षी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले एक वर्ष लोटूनही त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही.ती नुकसान भरपाई त्वरित देण्याची कार्यवाही करावी तसेच बियाण्यांची किंमत एकच कशी निर्धारित ठेवता येईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या.

पालकमंत्री म्हणाले की, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीन पिकाचा भाव अधिक असल्याने सोयाबीनचा पेरा हा जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावे. सोयाबीन या पिकाची बीजप्रक्रिया कशी करावी याची माहिती देणारे माहितीपत्रकाचे विमोचन पालकमंत्री यांच्याकडून करण्यात आले. तसेच कृषी विषयक अडचणीबाबत दर महिन्याला दोन पानांची टिप्पणी तयार करून घ्यावी व ती सादर करावी त्यामुळे पाठपुरावा करण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल.

खताचे भाव वाढले असल्यास त्याची माहिती सादर करावी तसे प्रसिद्धीपत्रक काढावे. एखादी कंपनी अथवा कृषी निविष्ठा केंद्र वाढीव दरात खत विकत असल्यास त्याची माहिती द्यावी.त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच खताचा जुना साठा संपत नाही तोपर्यंत नवीन खताचा साठा विक्री करू नये अशा स्पष्ट शब्दात सूचनाही दिल्या.

ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी आधार कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात येईल. इंटरनेट सुविधा या समस्येवर सदर कंपन्यांशी येत्या काही दिवसात बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात हळद लागवडीसाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत क्लस्टर स्तरावर लागवडीचे प्रयत्न मागील वर्षी केल्या गेले असून यावर्षी सुद्धा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत हळदीचे क्लस्टर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. तसेच कॉटन श्रेडर या मशीन मुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे,त्या मशीन बाबतची योग्य माहिती सादर केली.

तसेच कॉटन श्रेडर या मशीनमुळे कपाशीचे पीक निघाल्यानंतर कपाशीची झाडे काढण्यात येतात. मशीनद्वारे त्या झाडांचा बारीक चुरा होतो त्याचा शेतात खत म्हणून वापर करता येतो व जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते, यासाठी मानव विकास निधीतून कॉटन श्रेडर मशिन खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदर बैठकीत दिल्या.

शेतकऱ्यांना करडई या पिकाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. करडई या पिकाच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर चार ते पाच किलो बियाणे लागते तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण होते, करडई तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्यास मदत होईल, त्यामुळे घाणीपासून तेल तयार करण्याचे क्लस्टर उभारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी, खरिपाची तयारी करतांना कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना फ्रन्टलाइन वर्कर समजून खरीप हंगामापूर्वी लसीकरण करून घेण्याच्या सुचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिल्या.

कृषी विभागामार्फत गुलाबी बोंड अळीचे प्रभावीपणे नियंत्रण करणे, रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर करणे, पेरीव धान पद्धतीने लागवड करणे, यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणे, सूक्ष्म सिंचन पद्धती अवलंबणे, शेतीपूरक जोडधंदे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आदी अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी यावेळी दिली. सदर बैठकीत बियाणे व खतांची उपलब्धता, सिंचन, वीजपुरवठा या विषयावर सविस्तर आढावा घेण्यात आला.