‘त्या’ खगोलशास्त्रीय घटनेबद्दल इसरो व डीआरडीओशी प्रशासनाचा संपर्क

‘त्या’ खगोलशास्त्रीय घटनेबद्दल इसरो व डीआरडीओशी प्रशासनाचा संपर्क

चंद्रपूर दि. 5 एप्रिल : शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात आकाशातून लाल रंगाची वस्तु जमिनीवर पडताना दिसली. जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात गोलाकार रिंग आणि लोखंडी गोळे आढळले असले तरी या घटनेबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले हे अवशेष संबंधित पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. इतर ठिकाणी अशा आणखी वस्तु आढळल्यास नागरिकांनी सदर वस्तुला स्पर्श करू नये तसेच सेल्फी घेण्याचे टाळावे. याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल : पालकमंत्री   

            जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या तप्त वस्तु नक्की कशाच्या आहेत व कशामुळे पडल्या, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल. त्यासाठी प्रशासनाने इसरो आणि डीआडीओशी  संपर्क करून माहिती दिली आहे. या खगोलशास्त्रीय वस्तुंची पाहणी करण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम येण्याची शक्यता आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

            सुदैवाने आगीच्या तप्त गोळ्यामुळे आणि रिंग मुळे कोणतीही जिवीतहानी व वित्तहानी झाली नाही. रहिवासी भागात हे अवशेष पडले असते तर अघटीत घटना घडली असती. नागरिकांनी अशा घटनांची प्रशासनाला त्वरीत माहिती द्यावी,  असे आवाहनही त्यांनी केले.