प्रत्येक घरावर अभिमानाने फडकवा तिरंगा- ना. सुधीर मुनगंटीवार

प्रत्येक घरावर अभिमानाने फडकवा तिरंगा- ना. सुधीर मुनगंटीवार

 ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपुरातील निवासस्थानी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले ध्वजारोहण

चंद्रपूर, दि. १३ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असून आपण आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणार आहोत. अशात प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवूया आणि ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

‘हर घर तिरंगा’ स्वातंत्र्याचा उत्सव १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने श्री. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले . याप्रसंगी त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांत राष्ट्रध्वजाचा संपूर्ण आदर राखत प्रत्येक घरावर तिरंगा दिमाखदारपणे फडकवावा. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाची राष्ट्रीय अस्मिता आहे.’ अबाल वृद्धांमध्ये देशाभिमान जागृत राहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले. चंद्रपूर जिल्ह्यातून या अभियानाला यापूर्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपुरातील जनता ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होईल, असा विश्वासही श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

भारतीय अस्मितेचे प्रतीक

तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नसून भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला. या अभियानाच्या माध्यमातून सर्व शहिदांचे स्मरण करण्याची संधी देशवासीयांना मिळणार आहे.स्वातंत्र्यसैनिकांनी हसत हसत देशासाठी आपले प्राण अर्पण केले.स्वतः च्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य  भारत मातेच्या चरणी अर्पण केले. अश्या वीर शहिदांचे स्मरण करूया.२०४७ साली जेंव्हा स्वातंत्र्यदिनी तिरंगाचे ध्वजारोहण केले जाईल तेंव्हा या राष्ट्रध्वजाला जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक वंदन करतील, त्यासाठी प्रत्येक दिवशी देशाला पुढे प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करूया असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.