chandrapur I गृहअलगीकरणाच्या ठिकाणी फलक नसल्यास गुन्हे नोंदवा ,कोरोना टास्क समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देश

गृहअलगीकरणाच्या ठिकाणी फलक नसल्यास गुन्हे नोंदवा

कोरोना टास्क समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देश

Ø नागरिकांच्या सुविधेसाठी लसीकरणाची वेळ वाढवा

Ø दररोजचे लसीकरणाचे उद्दिष्ट 1500 पर्यंत न्यावे

Ø लवकरच 23 नवीन लसीकरण केंद्र सुरू होणार

Ø आठवडीबाजार व शाळेत नियमित कोरोना तपासणी करावी

Ø आरटीपीसीआर सेंटर सायं. 5 पर्यंत सुरू ठेवावे

Ø खाजगी हॉस्पीटलचा पर्याय खुला ठेवावा

Ø प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्वाची अन्टीजन कोरोना तपासणी करावी

चंद्रपूर, दि. 18 मार्च : कोव्हीड-19 रुग्ण असलेल्या गृह अलगीकरणाच्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यत दर्शनी भागात फलक लावणे बंधकारक आहे, जेणेकरून सदर ठिकाणी नागरिकांचा संपर्क येणार नाही व कोरोनाचा फैलाव रोखता येईल. पण काही ठिकाणी गृह अलगीकरणातील रूग्णांकडून सदर फलक काढून टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रापत झाल्या असल्याने अशा ठिकाणी संबंधीतांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी कोरोना टास्क समितीला दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आज कोरोना टास्क समितीची बैठक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आरटीपीसीआर चे प्रभारी राजेंद्र सुरपाम, जिल्हा लसीकरण अधिकारी संदिप गेडाम, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात आरोग्य सेवक, कोरोना योद्धा, 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून या सर्वांचे लसीकरण 25 एप्रिल पर्यंत 100 टक्के पुर्ण करण्याकरिता नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी सांगितले. सध्या 69 केंद्रावर कोरोना लस देण्यात येत असून आतापर्यंत 64 हजार 360 डोज देण्यात आले आहेत. यात 20 मार्चपर्यंत 24 हजार डोज लस साठा नव्याने प्राप्त होणार असून त्यानंतर 23 नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला निर्देशीत केले. दररोजचे कोराना लसीकरणाचे उद्दिष्ट 1500 पर्यंत वाढविण्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या उन्हाचे दिवस असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले असून कोरोना तपासणीसाठी जिल्ह्यातील सर्व आर.टी.पी.सी.आर. केंद्र देखील लवकर बंद न करता सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे त्यांनी सांगितले. प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व नागरिकांची ॲन्टिजन टेस्टींग करण्यासोबतच सुपरस्प्रेडर, आठवडी बाजार, शाळा, आश्रमशाळा व वस्तीगृहात नियमित कोरोना तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी 350 बेडचे शासकीय महिला रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत, लिक्वीड ऑक्सीजनचा व औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याची खबरदारी घेण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सूचित केले. खाजगी दवाखाण्यात व हॉटेलमध्ये कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होऊ शकतील का याबाबतदेखील त्यांनी आढावा घेतला व उपचारासाठी नागरिकांकरिता जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, वनिता गर्गेलवार व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.