मनपा शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मनपा शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व शाळा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा  

शालेय बचत बँकची सुरुवात

 

चंद्रपूर ४ जानेवारी – चंद्रपूर महानगरपालिका सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा येथे ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व शाळा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.जिल्हाधिकारी विनय गौडा तसेच आयुक्त विपीन पालीवाल, सहायक आयुक्त विद्या पाटील, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, शिक्षणाधिकारी नागेश नित उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या लेझिम पथकाद्वारे करण्यात आले. यावेळी शाळेचे स्नेहसंमेलन कार्यक्रम सुद्धा आयोजीत करण्यात येऊन विद्यार्थी व पालकांच्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी, निबंध, वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पालकांच्या स्पर्धेत विजयी महिला पालकांना मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस देऊन महिला पालकांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत शाळेपासूनच बँकेचे व्यवहार देखील समजणे गरजेचे आहे. सोबतच त्यांना लहानपणापासूनच पैशांची बचत करणं किती गरजेचे आहे हे लक्षात येणे गरजेचे आहे. याकरिता मनपा सावित्रीबाई फुले शाळेद्वारे शालेय बचत बँक सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार स्वतः करता येऊ शकणार आहेत. मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फीत कापुन शालेय बचत बँकेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले व शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेले काही सादरीकरण पाहून मा. जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी नर्सरी ते वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांनी विविध नाटिका, समूह नृत्य इत्यादींचे उत्तम सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा सहभाग लाभला.