विधानसभा अध्यक्षपद एका वर्षात राजीनामा देण्यासाठी नव्हतं; शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद पाच वर्षांसाठी दिलं होतं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे.
शिवसेनेनं काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या नव्या निवडीसाठी नाना पटोले यांचं अभिनंदन तर केलंच पण विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. “काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल”, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.