सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या व इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे – शरद पवार

सरपंच परिषद संघटनेकडे शरद पवारांनी व्यक्त केला आशावाद…

मुंबई दि. २६ ऑक्टोबर – सरपंच परिषदेच्या निमित्ताने सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या तसेच इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे आणि ग्रामस्तरावरील विविध समस्यांबद्दल शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी देखील सरपंच परिषदेने पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

राज्यातील थेट पद्धतीने निवडून आलेल्या सरपंचांचा समावेश असलेल्या सरपंच परिषद संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

सरपंच परिषदेची स्थापना एकत्रित पुढाकाराने केली गेली ही एक आनंदाची बाब असून कोरेगांव तालुक्यातील सरपंच जितेंद्र भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या पुढाकाराबद्दल शरद पवार यांनी विशेष अभिनंदन केले.

सरपंच परिषदेत महिला टक्केवारी ५० टक्के रहावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यात संघटनेचे विभागवार जाळं पसरावं, जेणेकरून अधिकाधिक संघटीत शक्ती ग्रामपंचायतींच्या उन्नतीसाठी एकत्रित येईल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा त्यामुळे बदलताना दिसेल असा आशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला.