chandrapur I क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाचा आढावा

क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाचा आढावा

चंद्रपूर, दि. 8 जून : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये कोरोना विषयक आढावा घेतला. यावेळी खासदार सुरेश धानोरकर, आमदार सर्वश्री नाना पटोले, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, क्राईस्ट हॉस्पीटलचे फादर जोसेफ जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याचा पहिल्या स्तरामध्ये समावेश असला आणि निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी हा स्तर कायम राखण्यासाठी किंवा आणखी कमी करण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे. अन्यथा पूर्ववत स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फुर्तीने काही निर्बंध घालण्याची गरज आहे. यंत्रणेने यात कोणतीही ढिलाई करू नये. शासनस्तरावरून प्रत्येक आठवड्याचा जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर तपासण्यात येत आहे. त्यानुसारच जिल्ह्याबाबत काय निर्णय घ्यायचे, हे निश्चित होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत अतिशय गांभीर्यपूर्वक वर्तणूक करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी आमदार नाना पटोले यांनी कोविड विषयाबाबत जिल्ह्याची माहिती जाणून घेतली. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच एकदम शेवटच्या तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा व्यवस्थित ठेवाव्यात, अशा सुचना त्यांनी केल्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 5-5 ऑक्सीजन बेडची व्यवस्था तसेच प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन पाईपलाईनचे नियोजन करण्यात आले आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीसचे 88 रुग्ण आढळले असून 53 जणांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहे. तर 33 जणांना सुट्टी देण्यात आली. दोन रुग्णांचा म्युकरमायकोसीसमुळे मृत्यु झाला. म्युकरमायकोसीसच्या 35 रुग्णांना एकत्रीत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने संबंधित रुग्णांना खनिज विकास निधीतून पाच लक्ष रुपयांपर्यंतचे इंजेक्शन मोफत देण्यात आले. म्युकरमायकोसीस आणि संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात लहान बालकांच्या संरक्षणासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे गठन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन हॉस्पीटलचे फादर जोसेफ जोशी यांनी केले. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स तसेच विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.