chandrapur I नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा उपायुक्त विशाल वाघ यांच्या स्वच्छता विभागाला सूचना

नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा उपायुक्त विशाल वाघ यांच्या स्वच्छता विभागाला सूचना

चंद्रपूर, ता. १ : पावसाळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिक वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून नागरिक जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नाले सफाईची कामे आठवडाभरात पूर्ण करा, अशा सूचना उपायुक्त विशाल वाघ यांनी दिल्या.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात मंगळवारी (ता. १) स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व कामे व इतर कामाची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपायुक्त विशाल वाघ, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, झोन १ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, मुख्य स्वच्छता निरीक्षक उदय मैलारपवार, झोन २ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विवेक पोतुनरवार, झोन ३ चे स्वच्छता निरीक्षक महेंद्र हजारे,  स्वच्छता निरीक्षक अनिरुद्ध राजूरकर आदी उपस्थित होते.

पावसाळा सुरू झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिक वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरून नागरिक जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते व घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाले, ड्रेनेज लाईन साफसफाई करणे व इतर सुविधा आणि उपाययोजना करण्याचे काम मागील महिनाभरापासून सुरु आहे. सध्यास्थितीत ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे आठवडाभरात पूर्ण करा, अशा सूचना उपायुक्त विशाल वाघ दिल्या. यावेळी नाले सफाईसाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढविणे, पहिला पाऊस येण्यापूर्वी गाळ उचलणे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करणे, गरजेनुसार फॉगिंग मशीन वाढविण्याच्या सूचना उपायुक्त विशाल वाघ यांनी दिल्या.

झोन एकमध्ये मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याची सफाई प्रगतीपथावर आहे. सिव्हिल लाईन्स  नागपूर रोड येथील सफाई ५ दिवसात पूर्ण होइल, मेडिकल कॉलेज ते जयश्रीया लॉनपर्यंतच्या नाल्याची सफाई, बाबुपेठ, आंबेडकर वॉर्ड येथील अपूर्ण कामे ५ दिवसात पूर्ण होतील, अशी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षकानी बैठकीत दिली. याशिवाय ज्या भागात नाले सफाई झाली नाही, असे निदर्शानास आल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात लेखी तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोकाट कुत्रे, गायी, डुक्करांचा बंदोबस्त करा
शहराच्या मुख्य मार्गावर मोकाट कुत्रे, डुक्कर, गाढव व जनावरांमुळे रस्त्याने चालताना नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांचा बंदोबस्त करा, त्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करून कारवाईच्या सूचना उपायुक्त विशाल वाघ यांनी दिल्या.