chandrapur I ५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा – महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश

५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा – महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश

मोक्षधाम स्मशानभूमीची केली पाहणी

चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. पूर्वी येथे एकाच वेळी सात ते आठ मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. मात्र, आता अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे येथे ५० ते ६० मृतदेह ठेवता येतील इतक्या क्षमतेचे सिमेंट काँक्रीट प्लेटफॉर्म तातडीने बांधण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी बांधकाम विभागाला दिले.
महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी शनिवारी (ता. २४) सकाळी शिव मोक्षधम स्मशानभूमीची पाहाणी केली. या भेटीदरम्यान महापौरांसोबत स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, उपायुक्त विशाल वाघ, शहर अभियंता महेश बारई, शिव मोक्षधाम समितीचे अध्यक्ष अजय वैरागडे, सचिव श्याम धोपटे आदी उपस्थित होते.

महापालिका हद्दीत काही दिवसांपासून कोरोनाच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत शवदाहिनीऐवजी लाकडावर अंत्यविधी सुरु करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसापासून मृत्यूचा आकडा वाढू लागल्याने नदीच्या काठावर व्यवस्था करण्यात आली. स्मशानभूमीवर मृतदेह जाळण्यासाठी वेटींग करावे लागत आहे. ही गैरसोय लक्षात येताच महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी शनिवारी (ता. २४) सकाळी स्मशानभूमीची तातडीने पाहणी केली. यावेळी त्यांनी शिव मोक्षधाम समितीचे पदाधिकारी, तेथील कर्मचारी आणि अंत्यसंस्कारासाठी सेवेत असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांशी महापौरांनी चर्चा केली.

स्मशानभूमीतील समस्या, अडचणी, गैरसोय आदींची आस्थेने विचारपूस केली. याशिवाय या भागात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, रात्री १०च्या आत सर्व अंत्यविधी पूर्ण करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.