chandrapur I लसीकरण कमी होऊ देवू नका – जिल्हाधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लसीकरण कमी होऊ देवू नका – जिल्हाधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

चंद्रपूर, दि. 07 एप्रिल : जिल्ह्याला आवश्यकतेप्रमाणे लस साठा मिळेलच तथापि लस साठा कमी झाला तर प्रसंगी लसीकरण केंद्र तात्पुरते बंद ठेवावे पण कोणत्याही परिस्थितीत सद्या लसीकरण कमी करण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे दिल्या.

जिल्हाधिकारी यांनी आज प्रतिबंधीत क्षेत्र, कोरोना मार्गदर्शक सूचना, संस्थात्मक विलगीकरण, कोरोना टास्क समितीद्वारे निरीक्षण भेटीबाबत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक व मुख्याधिकारी यांची व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी सांगितले की राज्यस्तरावर कोरोना परिस्थीती गंभीर आहे. एप्रिल महिना कठीण असून या महिण्यात कामाचा झपाटा आवश्यक आहे. आरोग्य व इतर यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयाने काम करावे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सूचनांचे पालन करतांना नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याचीही दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. सर्व प्रवासी वाहतून नियमाच्या अधिन राहून सुरू ठेवण्यात आली आहे. हॉल टिकीट असणारे डबलसीट परिक्षार्थी, उत्पादन करणारे उद्योग पुर्ण क्षमतेने सुरू असल्याने तेथील कामगार तसेच कार्यालयीन कर्मचारी, बँकेतील कर्मचारी यांना ओळखपत्र असल्यास अडवू नये. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना बोलावू नये, कोणतीही बैठक घेवू नये, सर्व बैठका ऑनलाईन घ्याव्या. सार्वजनिक वाहतुक व अपवादात्मक परिस्थतीत सामान्य नागरिकांकरिता गॅरेजेस व स्पेअर पार्टची दुकाने मर्यादीत क्षमतेत सुरू ठेवण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. बांधकामे सुरू आहेत, त्यामुळे बांधकाम साहित्याची वाहतुक सुरू ठेवावी. बांधकाम साहित्याची दुकाणे बंद राहतील तथापि त्यांना ऑनलाईन किंवा फोनद्वारे ऑर्डर घेता येईल.

होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांची कोरोना टास्क समितीने प्रत्यक्ष घरी जाऊन नियमितपणे पाहणी करावी. तालुक्यातील कोरोना रुग्णांचे स्थानिक ठीकाणीच व्यवस्थापन करण्याची सोय करावी. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक शाळा, धर्मशाळा, इमारती अधिग्रहीत करून प्रत्येक तालुक्यात किमान 100 ते 150 वाढीव बेड व ऑक्सीजनची व्यवस्था करून ठेवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिले.