शेतकऱ्यांनी नॅनो युरीयाचा जास्तीत जास्त वापर करावा- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगिता माने

शेतकऱ्यांनी नॅनो युरीयाचा जास्तीत जास्त वापर करावा- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगिता माने

 

भंडारा, दि. 17 मे : खरीप हंगाम पुर्व आढावा सभेत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी जिल्हयामध्ये नॅनो युरीया फवारणीची प्रात्यक्षिके घेऊन त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार तुमसर तालुक्यातील सुकळी येथील श्री.रमेश सहारे यांच्या भाजीपाला पिकांच्या शेतात नॅनो युरीया पिक प्रात्यक्षिक व मार्गदर्शन याचे आयोजन करण्यात आले.

 

नॅनो युरीया फवारणीची प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाची सुरूवात दि.16 मे 2023 रोजी करण्यात आली. श्री. सहारे यांच्या शेतात काकडी, ढेमसे व दोडका पिकाची लागवड आहे. या पिकावर प्रात्यक्षिकाव्दारे नॅनो युरीया बाबत मार्गदर्शन करण्यात आले .

 

प्रात्यक्षिक प्रसंगी मार्गदर्शन करतांना नॅनो युरीया मध्ये नत्राचे कण हे अतिसुक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात. नॅनो युरीयाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे पारंपारिक युरीया पेक्षा 10000 पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता 90 टक्यांपर्यत असते जी पारंपारिक युरीया मध्ये 30 ते 50 टक्के असते. नॅनो युरीया मधील नत्र हे उपलब्ध स्वरूपातील असल्यामुळे ते पिकांची नत्राची गरज प्रभावीपणे भागवते. नॅनो युरीया ची एक बाटली (500मिली ) आणि एक युरीयाची गोणी (45किलो ) यांची कार्यक्षमता समान आहे.

 

पारंपारिक युरियच्या तुलनेत नॅनो युरीया कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुक व साठवणुक खर्च कमी होतो. नॅनो युरीयाच्या वापरामुळे पाणी, हवा व जमीन यांची हानी थांबते. ग्लोबल वॉर्मिंग साठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते. नॅनो युरीयाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादतेमध्ये वाढ होते. खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकुण उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नॅनो युरीयाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगिता माने यांनी केले आहे.

 

नॅनो युरीयाचा वापर कसा कराल

 

1. फवारणीपुर्वी / वापरण्या पुर्वी नॅनो युरीया ची बाटली चांगली हलवावी .

 

2. सुक्ष्म कणांसाठी व पाने पुर्ण ओली होणेसाठी Flate Phone किंवा कट नोझल असलेल्या फवारणी पंपाचा वापर करावा .

 

3. एक लिटर पाण्यात 2 ते 4 मीली नॅनो युरीयाचा वापर करावा

 

4. सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी (उभ्या पिकावर )

 

5. इतर खतांसोबत मिसळून नॅनो युरीया जमिनीत वापरू नये )

 

6. जर नॅनो युरीयाची फवारणी केल्यांनतर 2 तासाच्या आत पाउस पडला तर फवारणी पुन्हा करावी

 

7. नॅनो युरीया सोबत जैविक उत्तेजक (Biostimulant), विद्राव्य खते किंवा किटकनाशके , तणनाशके यांचीही फवारणी घेता येते .फक्त एकत्र मिसळण्यापुर्वी सुसंगता चाचणी करावी .