chandrapur I दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सेवेचा उपयोग करावा सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अ.प्र.हांडा यांचे नागरिकांना आवाहन

दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सेवेचा उपयोग करावा सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अ.प्र.हांडा यांचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर, दि. 07 एप्रिल : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढला असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार दस्त नोंदणी विभागाच्या ऑनलाईन सेवा व सुविधांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा व दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करून सहकार्य करावे असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अ.प्र.हांडा यांनी केले आहे.

नागरीकांनी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता पीडीई द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरीकांनी सदर पीडीई डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर इ-स्टेप-इन या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर किंवा समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थीतीत आगाऊ वेळ आरक्षीत केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही.

विभागाच्या वेबसाईटवर लिव्ह अँड लायसन ई -रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यत थांबवण्यात आले आहे. सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहतील. याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या सुरू होते त्याचे कामकाज शनिवार रविवारी बंद करण्यात येत असून कार्यालय सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सूरु राहील.

नागरीकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वतःचे पेन आणावे, एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरू नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही, असेही सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. हांडा यांनी कळविले आहे.