मराठा समाज व खुल्या प्रर्वगातील कुटुंबाचे सर्वेक्षण आजपासून सुरू

मराठा समाज व खुल्या प्रर्वगातील कुटुंबाचे सर्वेक्षण

आजपासून सुरू

  • 3111 प्रगणक करणार सर्वेक्षण
  • प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न

भंडारा दि. 23 : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाची मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्वेक्षण परिपूर्ण व पारदर्शक व्हावे, यादृष्टीने जिल्हा प्रशासनतर्फे सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे याबाबतचे प्रशिक्षण नुकतेच 21  जानेवारी रोजी नियोजन सभागृहात घेण्यात आले.

            या सर्वेक्षणासाठी मागासवर्ग आयोगान जिल्हास्तरावर जिल्हाधिका-यांना व  उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांना सहायक नोडल अधिकारी नेमले असुन, प्रत्येक तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून तर नायब तहसीलदार यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पातळीवरचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.

यातील प्रगणकांना प्रत्येक गाव व नागरिक सहकार्य करतील असा विश्वास जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी व्यक्त केला. जिल्हयातील 7 तालुकयात 12 लाख 38 हजार 991 लोकसंख्या आहे. प्रगणक जिल्ह्यातील सुमारे 3 लक्ष 8 हजार कुटूबांना भेटी देऊन सर्वेक्षणाचे काम पुर्ण करणार आहेत.

जिल्हयासाठी एकुण 207 पर्यवेक्षक तर 3111 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहे. तर 21 राखीव पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांनी दिली. या सर्वेक्षणात अधिक अचूकता यावी यासाठी सविस्तर प्रश्न नमूद करण्यात आली आहे. नागरिकांनी सदर माहिती आहे त्या वस्तूस्थितीला धरुन द्यावी असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.