एफडीएकडून अन्नपदार्थाचा 36 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त
Ø सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
चंद्रपूर, दि.04 : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरच्यावतीने 92 आस्थापनांची तपासणी करून 170 अन्ननमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याने 51 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आली. यापैकी 10 आस्थापनांचे परवाने/नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहेत. तसेच 15 प्रकरणामध्ये भेसळीच्या संशयावरून 36 लाख रूपये किंमतीचा 8988 किलो अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. यात खाद्यतेल, खवा, मिरची पावडर, हळद पावडर, धनिया पावडर व इतर मसाले, गुळ, शेंगदाणे, चहा पावडर इत्यादी अन्नपदार्थाचा समावेश आहे.
1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर या कालावधीतील कारवाई : 1) 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध आस्थापनांमधून एकूण 316 अन्न नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 210 नमुने प्रमाणित घोषित झाले असून 96 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच 3 अन्न नमुने कमी दर्जाचे व 5 अन्न नमुने मिथ्याछाप असल्याचे घोषित झाले. 2 अन्न नमुने असुरक्षित घोषित झाले आहेत. त्यापैकी 8 प्रकरणात सह आयुक्त, नागपूर यांच्याकडे न्यायनिर्णयासाठी खटले दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित प्रकरणी पुढील कारवाई घेण्यात येत आहे.
2) या कालावधीत 243 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 135 अन्न आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या असून 10 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. 29 आस्थापनांविरुध्द दंडात्मक कारवाई करून 2 लक्ष 20 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. 3) तसेच सदर कालावधीत 15 प्रकरणात विविध 36 लक्ष रुपये किमतीचा 8988 किग्रॅ अन्नपदार्थाचा साठा, कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे.
नागरिकांना अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाशी टोल फ्री क्रमांक 1800222365 किंवा complaints.mahafda.in वर संपर्क साधावा. तक्रार करताना तक्रारीमध्ये स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रार केलेल्या आस्थापनेचा अचूक पत्ता, कोणत्या अन्नपदार्थ बाबत तक्रार आहे, ही सखोल माहिती तक्रारी मध्ये नमूद करावी.
तसेच, अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 च्या अंतर्गत नियमांचे पालन करूनच अन्न व्यवसाय करावा, अन्यथा कठोर कारवाई घेण्यात येईल. नागरिकांना निर्भेळ अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यात कोणी भेसळ केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केल्या जाईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्याचे चंद्रपूरचे सहायक आयुक्त प्र.अ. उमप यांनी कळविले आहे.







