Home Breaking News प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास नमुना क्र. ६ द्वारे पुन्हा नोंदणी करता...

प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास नमुना क्र. ६ द्वारे पुन्हा नोंदणी करता येणार

प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास नमुना क्र. ६ द्वारे पुन्हा नोंदणी करता येणार

मुंबई, दि. ४ : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत पूर्वी नाव असतानाही आता नाव समाविष्ट नसलेल्या नागरिकांना मतदार यादीत पुन्हा नाव नोंदविण्यासाठी नमुना क्र. ६ द्वारे नव्याने अर्ज करता येणार आहे. यापूर्वी मतदार यादीत नाव असतानाही नमुना क्र. ६ मध्ये अर्ज केल्यामुळे संबंधित मतदाराने खोटी घोषणा केली, असे मानले जाणार नाही. तसेच, याप्रकरणी संबंधित मतदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

नमुना क्र. ६ मध्ये पहिल्यांदाच मतदार यादीत नाव समाविष्ट होत असल्याबाबत घोषणा करावी लागते. त्यामुळे पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्या; मात्र सध्याच्या प्रारूप यादीत नाव नसलेल्या काही मतदारांमध्ये नव्याने अर्ज करताना संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, नमुना क्र. ६ मधील घोषणा १ ऑगस्ट २०२२ पासून लागू करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेला कोणताही पात्र मतदार अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी निर्धारित प्रक्रियेनुसार नमुना क्र. ६ भरून अर्ज करू शकतो. प्रारूप यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या मतदार यादीत संबंधित नागरिकाचे नाव होते किंवा नव्हते, याचा अर्ज स्वीकारण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यामुळे नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी हा अर्ज केला जात असल्याने, पूर्वी मतदार यादीत नाव होते या कारणास्तव नमुना क्र. ६ मधील घोषणा खोटी ठरत नाही. त्यामुळे अशा मतदारांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अंतर्गत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

मात्र, अर्ज करणाऱ्या मतदाराचे नाव महाराष्ट्रातील किंवा देशातील अन्य कोणत्याही राज्याच्या सध्याच्या मतदार यादीत समाविष्ट नसणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी निर्धारित प्रक्रियेनुसार नमुना क्र. ६ भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.