नरेगा, जलयुक्त शिवार योजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

नरेगा, जलयुक्त शिवार योजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

कामे सुरू असलेल्या ठिकाणी आयुष्यमान भारत

व अटल विमा योजनेचे शिबिर लावण्याचे निर्देश

 

भंडारा, दि. 6 : जलयुक्त शिवार कार्यक्रमांमध्ये कामाची प्रगती पाहण्याकरिता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज प्रत्यक्ष पवनी तालुक्यातील मिन्सी, कवलेवाडा, कोंढा, बाम्हणी येथे रोजगार हमी योजना व नाला खोलीकरण तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामांना भेट देऊन कामांची पाहणी केली.

 

कामावर उपस्थित मजुरांशी त्यांनी चर्चा केली. कामाचा मोबदला वेळवर मिळतो की नाही याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपचाराबाबत त्यांनी यावेळेस मजुरांसाठी ते काम करत असलेल्या ठिकाणीच शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले. तसेच पोस्टाच्या जीवन ज्योती विमा योजनेबाबतही त्यांनी कामाच्या ठिकाणी कॅम्प लावण्याचे निर्देश दिले.

 

रोजगार हमी योजनेच्या कामावर कार्यरत मजुरांनी दोन पाळीत (सकाळ व सायंकाळी) ऊन कमी असतांना काम करण्यात येत असल्याचे सांगितले तसेच कामाचा मोबदला वेळ मिळत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा हजारे, उपजिल्हाधिकारी नरेगा श्रीपती मोरे, कार्यकारी अभियंता जलसंधारण, जिल्हा परिषद अनंत जगताप, तहसीलदार मयूर चौधरी, कृषी विभागाचे कृषी अधिकारी मनीषा पाटील व श्री. राऊत हे उपस्थित होते. यावेळी नरेगाच्या कामाची पाहणी करतांना मजूर उपस्थिती नोंदवही, कामाच्या ठिकाणी मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्ध होते.

 

भेंडाळा येथील चिंतामणी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी या कंपनीचे प्रतिनिधी राजेंद्र फुलबांधे यांनी हळद, तांदूळ या कंपनीच्या उत्पादनाची माहिती दिली. प्रभावी मार्केटिंग करण्याबाबत यावेळी कृषी विभाग व कंपनी प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आसगाव येथील चौरास व आसगावकर या शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट दिली. त्यांच्या कामातील अडचणी ही समजून घेतल्या. यावेळी संचालक अनिल मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.