महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती
गेल्या 3 महिन्यांत 2 लाखांवर ग्राहकांचा सहभाग
पर्यावरणस्नेही 7 लाखांवर ग्राहकांना 8 कोटींचा फायदा
नागपूर, 6 ऑक्टोबर 2025: वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल 2 लाख 3 हजार 340 वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून सोमवार (दि. 6) पर्यंत लघुदाब वर्गवारीतील पर्यावरणस्नेही 7 लाख 6 हजार 924 ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहे व त्यांना 8 कोटी 48 लाख 30 हजार 880 रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
‘गो-ग्रीन योजनेतील वीजग्राहकांचा वाढता प्रतिसाद सहभाग स्वागतार्ह आहे. त्यांना वीजबिल डिजिटल स्वरुपात पाठवले जात आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे’, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केले आहे.
गेल्या तीन महिन्यांत 2 लाखांवर ग्राहकांचा सहभाग :वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. विशेष म्हणजे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये 2 लाख 3 हजार 340 ग्राहकांची या योजनेत भर पडली आहे. यात सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील 87 हजार 40 ग्राहकांचा तर कोकण प्रादेशिक विभागातील 78 हजार829 ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेत आतापर्यंत 7 लाख 6 हजार 924 पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना 8 कोटी 48 लाख 30 हजार 880 रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये (कंसात आर्थिक फायदा रूपयांत) पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक 2 लाख 88 हजार 238 (3.46 कोटी), कोकण- 2 लाख 62 हजार 237 (3.15 कोटी), नागपूर प्रादेशिक विभाग- 84हजार 531 (1.01 कोटी) आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागामध्ये योजनेत सहभागी 71 हजार 918 वीजग्राहकांना 86 लाख 30 हजार रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
असे व्हा योजनेत सहभागी: गो-ग्रीन योजनेसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट करावे लागेल व छापील बिलाची प्रत रद्द करून संबंधितांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व इमेलवर दरमहा बिल पाठविण्यात येईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेल बदलण्याची सोय देखील त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.
वार्षिक 120 रूपयांचा फायदा: महावितरणकडून गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. यात ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक 120 रुपयांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील 12 महिन्यांची म्हणजे 120 रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.
गो-ग्रीन योजनेचे फायदे: गो-ग्रीन सहभागी झालेल्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईल ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही ऑनलाईन बिल भरणे सोयीचे झाले आहे. इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणक किंवा मोबाइलमध्ये जतन करून ठेवता येते. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.