उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 व 30 मे रोजी जिल्ह्याकरीता यलो अलर्ट जारी Ø उष्माघाताबाबत खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 व 30 मे रोजी जिल्ह्याकरीता यलो अलर्ट जारी

Ø उष्माघाताबाबत खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 आणि 30 मे रोजी जिल्ह्याकरीता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जे नागरीक घराबाहेर बराच वेळ घालवतात त्यांना उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता जीवघेणी ठरु शकते. जेव्हा शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हा ही स्थिती उद्भवू शकते.

उष्माघाताची लक्षणे : शरीराचे उच्च तापमान, अनेकदा १०४°F (४०°C) पेक्षा जास्त असते. यामुळे गोंधळ, चक्कर येणे आणि मळमळ होऊ शकते. नाडीचे ठोके वाढणे आणि डोकेदुखी ही देखील सामान्य लक्षणे आहेत. त्वचा उष्ण आणि कोरडी किंवा ओलसर आणि घाम वाटू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध पडणे किंवा झटके येऊ शकतात. स्वतःला किंवा इतर कोणाला ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळावे. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे, सोबतच ओआरएसचा वापर करावा. पाणीयुक्त फळे खावीत. नागरीकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून वृद्ध, लहान मुले तसेच पूर्व- अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती ज्यांची चांगली नाही त्यांनी अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे.

काय करु नये : उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.